प्रभात वृत्तसेवा पिंपरी – प्रभाग क्रमांक १५ मध्ये गुरूवारी (दि. ८) प्रचार रॅली काढण्यात आली. भाजपचे अधिकृत उमेदवार शैलजा मोरे, शर्मिला बाबर, राजू मिसाळ आणि अमित गावडे या कमळाच्या चार पाकळ्या एकत्र रस्त्यावर उतरल्या आणि सेक्टर २८ मध्ये प्रचार रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जयहिंद चौकापासून सुरू झालेली ही रॅली म्हणजे केवळ प्रचार नव्हता, तर कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास आणि मतदारांचा विश्वास यांचा संगम होता. हेच आमचे उमेदवार, हेच आमचे चिन्ह असा सूर प्रत्येक वळणावर, प्रत्येक गल्लीत ऐकू येत होता. कमळाच्या चिन्हाने सजलेले झेंडे, घोषणांनी दुमदुमलेले चौक आणि नागरिकांचा वाढता सहभाग असे दृश्य दिसून येत होते.ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक आणि व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला. प्रचाराचा हा प्रवास म्हणजे मतदारांपर्यंत पोहोचण्याचा नव्हे, तर मतदारांना सोबत घेऊन चालण्याचा प्रयत्न असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसले. या प्रचार रॅलीला भाजप युवा मोर्चा अध्यक्ष अनुप मोरे, माजी महापौर आर. एस. कुमार यांच्यासह अरुण थोरात, अतुल इनामदार, शाहीर प्रकाश ढवळे, तेजस ढेरे, सचिन कुलकर्णी, सागर घोरपडे, अविनाश तळेकर, मामा मिसाळ, अविनाश काचोळे, निकेश दाखवणे यांची ठळक उपस्थिती होती.