प्रभात वृत्तसेवा पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १, चिखली येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या पूर्ण पॅनलला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मिस्ट्री वूड्स आणि विस्टेरिया सोसायटीतील रहिवाशांनी उमेदवारांचे फुलहार, घोषणाबाजी आणि आपुलकीने भव्य स्वागत केले. यावेळी उमेदवार विकास साने, साधना काशिद, संगीता ताम्हाणे, यश साने उपस्थित होते. या भेटीदरम्यान उमेदवारांनी नागरिकांशी थेट संवाद साधत परिसरातील पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज, स्वच्छता, आरोग्य सुविधा आणि वाहतूक यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर चर्चा केली. नागरिकांनीही आपले प्रश्न, अपेक्षा आणि सूचना मांडत विकासाभिमुख नेतृत्वाला पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले. नागरिकांनी दाखवलेला विश्वास, प्रेम आणि पाठिंबा हा आमच्या जबाबदारीत अधिक वाढ करणारा असून, प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा देणारा आहे, अशी भावना उमेदवारांनी व्यक्त केली. नागरिकांच्या समस्या समजून घेऊन त्यावर ठोस उपाययोजना करत चिखलीच्या प्रगतीसाठी सातत्याने कटिबद्ध राहण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.