प्रभात वृत्तसेवा पिंपरी – पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १८ (ब) मधून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या उमेदवार ज्योती निंबाळकर यांच्या प्रचाराला वेग आला आहे. नागरिकांचा विशेषतः महिलांचा मोठा पाठिंबा त्यांना मिळत आहे. घरोघरी भेटी, थेट संवाद आणि स्थानिक प्रश्नांवरील ठाम भूमिका यामुळे पूजा आगज्ञान (अ गट), ज्योती निंबाळकर (ब गट), अनंत को-हाळे (क गट) आणि अश्विनी चिंचवडे (ड गट) या राष्ट्रवादीच्या चारही उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली आहे.नागरिकांशी संवाद साधताना निंबाळकर यांनी पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, ड्रेनेज, स्वच्छता, आरोग्य सुविधा आणि महिला सुरक्षेसारख्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले. प्रभागातील समस्या केवळ ऐकून न घेता त्या सोडवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल, असा विश्वास त्यांनी मतदारांना दिला. महिलांशी संवाद साधताना त्यांनी महिला सक्षमीकरण, स्वयंरोजगार आणि मूलभूत सोयी-सुविधा बळकट करण्याचा संकल्प मांडला. “प्रभागाचा सर्वांगीण विकास, पारदर्शक कारभार आणि प्रत्येक घटकाला न्याय देणे हेच माझे ध्येय आहे,” असे निंबाळकर म्हणाल्या. वाढत्या जनसंपर्कामुळे प्रभाग १८ मधील निवडणूक लढत अधिकच रंगतदार होत असल्याचे चित्र दिसत आहे.