प्रभात वृत्तसेवा पिंपरी – भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने शेवटच्या क्षणापर्यंत एबी फॉर्म न देता उमेदवारीमध्ये उत्सुकता ठेवली. मात्र, त्याची किमत देखील भाजपाला चुकवावी लागत असून अनेक ठिकाणी भाजपच्या बंडखोरांनी अपक्ष अर्ज भरले आहेत. अर्ज माघारी न घेता आम्हाला आशेला लावत आमची फसवणूक केली असल्याचा आरोप करत लढण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे अनेक प्रभागात भाजपचे उमेदवारांना तगडी फाइट मिळत आहे. भाजपने सुमारे दोन डझन इतर पक्षातील नेत्यांना आयात करुन त्यांना उमेदवारी देऊ केली आहे. जवळपास एवढ्याच प्रबळ इच्छुकांना डावलले आहे. यामुळे अनेक ठिकाणी प्रभागातील भाजपचे तुल्यबळ नेते अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.महापालिका निवडणुकीसाठी अर्ज माघारी घेण्याची प्रक्रिया शुक्रवारी पार पडली. त्यानंतर आता निवडणुकीच्या रिंगणात ६९२ उमेदवार असून ४४३ उमेदवारांनी माघार घेतली आहे. असे असले तरी तब्बल १४९ इतके अपक्ष मैदानात आहेत. त्यामध्ये भाजपचे सर्वाधिक बंडखोर असून त्याखालोखाल राष्ट्रवादीमधून बंडखोरी केलेले उमेदवार रिंगणात आहेत. प्रभाग ३२ सांगवी मध्ये तर भाजपच्या माजी महापौर माई ढोरे यांच्याविरोधात त्यांच्याच पक्षाच्या माजी नगरसेविका शारदा सोनवणे उभ्या राहिल्या आहेत. त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला असून त्यांना शिवसेना (शिंदे गट) पक्षाने पुरस्कृत केले आहे. सोनवणे आणि ढोरे या २०१७ ला एकाच पक्षातून एकाच प्रभागातून निवडून आल्या होत्या. ढोरे यांना अडीच वर्ष महापौरपद देण्यात आले. तर सोनवणे यांनी विधी समितीचे सभापतीपद भूषवले आहे. आता दोघेही एकमेकांच्या विरोधात उभ्या असून राष्ट्रवादी काँग्रेसने उज्जवला ढोरे यांना रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे सामना तिरंगी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.दुसरीकडे शिक्षण समितीच्या माजी सभापती मनिषा पवार यांच्याविरोधात त्यांच्याच पक्षातील पदाधिकार्यांनी अपक्ष अर्ज भरले आहेत. २०१७ साली प्रभाग क्रमांक २३ मधून भाजपच्या मनिषा पवार निवडून आल्या होत्या. त्यांनी शिक्षण समितीच्या सभापतीपद भूषवले. आताही त्यांना भाजपाने तिकीट दिले आहे. मात्र, त्यांच्याच प्रभागातील भाजपच्या बंडखोरांनी त्यांच्याविरोधात निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली आहे. प्रभाग २३ मधून भाजपच्या कांचन जावळे, रेखा माने यांनी अपक्ष अर्ज भरले असून निवडणूक लढण्याचा निर्धार केला आहे.