प्रभात वृत्तसेवा पिंपरी – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक १५ जानेवारी रोजी होणार असून, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. तर दुसरीकडे आपला विजय सुकर व्हावा यासाठी प्रमुख पक्षातील उमेदवार प्रतिस्पर्धी पक्षातील वेगळा गटातील उमेदवारांची संधान साधत आहेत. याबाबतच्या बातम्या बाहेर येऊ लागल्याने पक्ष उमेदवारांच्या पॅनलमध्ये संशय कल्लोळ निर्माण झाला आहे. निवडणुकीसाठी इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पक्षांतर्गत चर्चा, समन्वय आणि मनधरणीचे सत्र वेगाने सुरू झाले. अनेक ठिकाणी पक्ष नेतृत्वाच्या मनधरणीला यश मिळाले असून काहींनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे. तरीही काही अपक्ष उमेदवार रिंगणात ठाम असल्याने लढत अधिक चुरशीची होताना दिसत आहे.या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), भाजप यांच्यासह शिवसेना (उभाठा), राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट), शिवसेना (शिंदे गट), काँग्रेस, आरपीआय या प्रमुख पक्षांचे उमेदवार रणांगणात उतरले आहेत. बहुतांश प्रभागांत मुख्य लढत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) अशी रंगण्याची चिन्हे आहेत; तर काही ठिकाणी बहुरंगी लढत होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.प्रचाराला वेग आला असून, एका बाजूला उमेदवार घराघरात संपर्क साधत आहेत, नागरिकांच्या भेटीगाठी घेत आहेत, कोपरा सभा, पदयात्रा, रॅली यांच्या माध्यमातून शक्तीप्रदर्शन सुरू आहे. दुसरीकडे, प्रतिस्पर्धी पक्षातील वेगवेगळ्या गटांशी ‘समन्वय’ साधण्याचे गुप्त प्रयत्नही सुरू असल्याची कुजबुज राजकीय वर्तुळात आहे. “तू मला मदत कर, मी तुला मदत करतो” अशा प्रकारच्या आश्वासनांचा उच्चार पॅनलबाहेरील गोपनीय बैठकींमध्ये केला जात असल्याचे बोलले जात आहे.यातील वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे फोन रेकॉर्डिंग होण्याची भिती असल्याने अशा संपर्कासाठी उमेदवार मोबाइलचा सर्रास वापर टाळत आहेत. नियमित फोन कॉल्सऐवजी व्हॉट्सअॅप कॉलिंग, लघुसंदेश आणि तिसऱ्या व्यक्तींमार्फत संदेशवहनाचा आधार घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळे पॅनेलमध्येच एकमेकांबद्दल संशयाचे वातावरण तयार होऊ लागले आहे. काही ठिकाणी प्रचारापेक्षा “आपला कोण कोणाशी बोलतोय?” याचाच उलगडा करण्यावर कार्यकर्त्यांचे अधिक लक्ष केंद्रित झाल्याचे दिसते.क्रॉस वोटिंगची शक्यता ही या घडामोडींचे केंद्रबिंदू बनली आहे. पॅनलप्रमाणे एकदिलाने मतदान व्हावे, हा पक्षांचा प्रयत्न असताना काही उमेदवार स्वतःच्या विजयाला प्रथम प्राधान्य देत प्रतिस्पर्धी पक्षातील वेगळ्या गटांशी संधान साधत असल्याची चर्चा रंगते आहे. क्रॉस वोटिंग झाल्यास संपूर्ण पॅनलच्या निकालावर त्याचा परिणाम होऊ शकतो, हे माहीत असतानाही काही जण जोखीम घेण्यास मागेपुढे पाहत नाहीत, अशी टीका कार्यकर्त्यांकडून ऐकावयास मिळत आहे.या पार्श्वभूमीवर पॅनेलमध्ये संशयाचा कल्लोळ वाढत चालला आहे. कोण कोणाशी संपर्कात आहे, कोण कुणाला गुपचूप मदत करणार, कोणावर विश्वास ठेवायचा या प्रश्नांनी पक्षांच्या आंतरिक बैठका अधिक तापल्या आहेत. उमेदवारांमधील संवाद कमी होणे, अचानक बदललेली प्रचार रणनीती आणि गटगटांत होणाऱ्या बैठका यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मतदार मात्र शांतपणे संपूर्ण घडामोडीकडे लक्ष ठेवून आहेत. स्थानिक प्रश्न, विकासाच्या अपेक्षा, मूलभूत सुविधांचा अभाव आणि नेतृत्वाची विश्वासार्हता या मुद्द्यांवर मतदार चर्चा करत असल्याचे चित्र दिसत आहे. शेवटच्या टप्प्यात पॅनलमधील संशयाचा कल्लोळ निवडणुकीच्या समीकरणांवर किती परिणाम करतो, याकडे राजकीय वर्तुळासह संपूर्ण शहराचे लक्ष लागून राहिले आहे.