प्रभात वृत्तसेवा पिंपरी – महापालिका निवडणुकीसाठी राजकीय समीकरणे जुळविण्याचे काम सुरू असतानाच भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे समीकरण बिघडले असल्याचे समोर आले आहे. खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडून जादा जागांची मागणी होत असून त्याला भाजपाने नकार दिला आहे. त्यामुळे शिवसेना स्वबळाची चाचपणी करत असून भाजपाने आरपीआयला सोबत घेत लढण्याचा निर्धार केला असल्याची माहिती मिळाली आहे. पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना आणि आरपीआय पक्षांनी एकत्र येत महायुतीच्या माध्यमातून निवढणूक लढविण्याचा निर्णय घेतला होता. मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आणि शिवसेनेच्या युतीची देखील चर्चा झाली होती. भाजपसोबत युती करण्यासाठी शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी ३२ जागांची मागणी केली होती. एका प्रभागात एक जागा याप्रमाणे त्यांनी गणित मांडले होते. मात्र, त्याला भाजपाने नकार दिला. त्यानंतर बारणे यांनी किमान २५ जागा मिळाव्यात ही मागणी केली. मात्र, भाजपाने त्याला देखील नकार दिला असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे भाजपाकडून १५ जागा देण्याची देखील तयारी नाही. कमी जागा लढविल्यास शिवसेनेतून पुन्हा गळती होण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्वबळावर लढण्याची तयारी शिवसेनेकडून सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, राष्ट्रावादी काँग्रेससोबत युती करण्याची चर्चा झाली होती. परंतु आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असल्याने शिंदेसेनेला तो दरवाजा देखील बंद झाला आहे. त्यामुळेच भाजपकडून कमी जागांमध्ये सेनेची बोळवण करण्याचा राजकीय डाव आखला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.