प्रभात वृत्तसेवा पिंपरी – महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. दोन्हीही पक्षांनी एकमेकांचे उमेदवार फोडत त्यांना आपल्या पक्षात स्थान दिले आहे. मात्र, यामुळे निष्ठावंताच्या पायाखालची जमिन सरकली असून त्यांनाच उमेदवारीसाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. उमेदवारी नाही मिळाली तर इतर पक्षातून लढण्यासाठी हे निष्ठावंत आता चाचपणी करत आहेत. त्यामुळे या बंडोबांना थंड करताना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील वरिष्ठांची दमछाक होणार आहे.पिंपरी-चिंचवड महापालिका काबीज करण्यासाठी सत्ताधारी महायुतीतील भाजपा तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चुरस आहे. ज्या प्रभागात पक्षाचा नगरसेवक नाही किंवा पॅनेल कमकुवत आहे, त्या ठिकाणी दुसर्या पक्षातील इच्छुक तसेच, माजी नगरसेवकांना प्रवेश दिला जात आहे. भाजपा आणि राष्ट्रवादी पक्षात हे प्रमाण मोठे आहे. माजी नगरसेवक, पदाधिकारी, निष्ठावंत व इच्छुक ज्यांच्या विरोधात लढले. पक्षासाठी सर्वस्व पणाला लावले. पक्षाने दिलेला कार्यक्रम प्रामाणिकपणे राबवला. निष्ठावंत म्हणून पक्षासाठी जीवाचे रान केले, त्यांच्याच जागेवर पक्षाने इतर पक्षातील पदाधिकाऱ्यांना स्थान दिले आहे. त्यांना उमेदवारीचे खात्री दिली जात आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून पक्षासाठी जीवाचे रान करणाऱ्या निष्ठावंताच्या वर्मी घाव लागला आहे. विशेष म्हणजे ज्यांच्या विरोधात महापालिका सभागृहामध्ये रान उठवले त्यांचाच प्रचार करण्याची वेळ आली आहे. त्यांच्यासाठी घरोघरी जाऊन मते कशी मागायची, असा प्रश्न त्यांना पडला आहे.या फोडाफोडीमुळे नाराजांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्याचा फटका भाजपासह राष्ट्रवादी काँग्रेसला बसणार, असे चित्र निर्माण झाले आहे. पक्षश्रेष्ठींना ती नाराजी दूर करण्यात यश मिळत नसल्याचे दिसत आहे. येत्या दोन दिवसांत उमेदवार जाहीर केल्यानंतर या नाराजीचा स्फोट होणार आहे. अनेकजण पक्ष बदलतील. त्यामुळे दोन्ही पक्षाच्या संघटनबांधणीला तडा जाणार आहे. त्याचा फटका निवडणुकीमध्ये बसणार असल्याने बंड करणाऱ्यांना रोखताना पक्षश्रेष्ठींच्या नाकीनऊ येणार आहेत. होणार उलथापालथ? भाजपात माजी महापौर संजोग वाघेरे व माजी नगरसेविका उषा वाघेरे यांना प्रवेश दिल्याने भाजपाचे माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी राष्ट्रवादीची वाट धरली आहे. तसेच, राष्ट्रवादीचे राजू मिसाळ, शिवसेनेचे अमित गावडे यांचे भाजपात स्वागत झाल्याने तेथील भाजपाचे पदाधिकारी व इच्छुक नाराज झाले आहेत. त्यांनी आत्मक्लेश आंदोलन करून आपली नाराजी प्रकट केली. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे राहुल कलाटे यांना भाजपाने घेतल्याने तेथील भाजपाचे माजी नगरसेवक तसेच, पदाधिकार्यांनी थेट पत्रकार परिषदेत घेत विरोध दर्शविला होता. आता ते देखील वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत. भोसरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधील बड्या नेत्याच्या घरातीलच उमेदवाराला गळाला लावण्याची तयारी भाजपाने केली आहे. असे झाले तर तेथील भाजपामध्ये अंतर्गत कलह होणार आहे. पदाधिकारी संभ्रमात फोडाफोडीच्या राजकारणामुळे भाजपासह राष्ट्रवादी काँग्रेसचे नाराज इच्छुक व पदाधिकारी संभ्रमात आहेत. ही नाराजी वाढत असल्याने उमेदवारी अर्ज घेण्याची संख्या झपाट्याने वाढत आहे. तिकीट मिळेल की नाही याची शास्वती नसलेल्या उमेदवारांनी अर्ज भरण्यास देखील सुरूवात केली आहे. चिंचवडमधील प्रभाग क्रमांक १७ मधून माजी उपमहापौर सचिन चिंचवडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.