प्रभात वृत्तसेवा पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी अर्ज माघारी घेतल्यावर शनिवारी चिन्हांचेही वाटप करण्यात आले. त्यामुळे प्रचारांत चांगलीच रंगत आली आहे. शहरातील सोसायट्या, कॉलनी आणि अपार्टमेंट राजकीय हालचालींचे केंद्र बनल्या आहेत. इच्छुक उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते थेट मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सोसायटी मीटिंगवर भर देत असून बैठकींच्या तारखांसाठी अध्यक्ष आणि सचिवांची अक्षरशः मनधरणी सुरू आहे. निवडणूक येताच पुन्हा एकदा सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक १५ जानेवारी रोजी होत आहे. प्रचारासाठी केवळ अकरा दिवस मिळणार आहेत. सुमारास ५० हजार मतदारांपर्यंत पोचण्यासाठी उमेदवारांची धावपळ सुरू असल्याने शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. निवडणूक चिन्ह मिळताच अपक्षांसह राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी थेट सोसायट्यांच्या दारात पोहोचण्याची रणनीती अवलंबली आहे. परिणामी शहरातील बहुमजली इमारती, गृहनिर्माण संस्था आणि कॉलन्यांमध्ये “मीटिंग ठेवा ना भाऊ!” अशी विनंती करणारे फोन सातत्याने वाजत असल्याचे दृश्य दिसत आहे. प्रत्येक प्रभागात कार्यकर्त्यांची ‘सेटिंग नेटवर्क’ सक्रिय झाले असून चेअरमन, सचिव व खजिनदारांपर्यंत पोहोचण्यासाठी जुन्या ओळखी, नातेसंबंध आणि मैत्रीचा पत्ताही खेळला जातोय. “आपण तर एकाच गावचे”, “शाळा तर आपलीच होती”, “फक्त १५ मिनिटं बैठक ठेवून द्या”, अशा संवादांनी अनेक सोसायटी कार्यालये गजबजलेली आहेत. सोसायटी मीटिंगसाठी तारीख मिळवणे मात्र सोपे राहिलेले नाही. काही ठिकाणी सलग मागण्या, वारंवार फोन, मेसेजेस आणि भावनिक आवाहने केली जात असल्याचे सांगितले जाते. एकाच सोसायटीत दोन-तीन इच्छुकांनी बैठक मागितल्याने सचिवांची कसरत वाढली असून “पहिल्यांदा जो येईल त्याला संधी” असा मध्यममार्ग काढला जात आहे. एकगठ्ठा मतांची अपेक्षा निवडणुकीचे औचित्य साधून अनेक सोसायट्यांमध्ये अचानक लोकसहभाग वाढला आहे. नियमित अजेंड्यावर पाणीपुरवठा, लिफ्ट, स्वच्छता, पार्किंग, सुरक्षारक्षक, सीसीटीव्ही असे विषय असले तरी “उमेदवार येणार आहे” एवढे ऐकले की उपस्थिती दुप्पट होत असल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी तर “उमेदवार नाही, तर मीटिंगही नाही” अशी अट पुढे आली आहे. अनुभवी नेते घरगुती गाठीभेटी, चहाच्या कट्ट्यांवरील संवाद यांना प्राधान्य देत आहेत, तर नवखे इच्छुक मोठ्या सोसायटी सभागृहात मोठ्या बैठकींच्या मागे धावताना दिसतात. “सोसायटी मिळाली म्हणजे दोनशे मते पक्की” हा समज अजूनही राजकीय वर्तुळात ठाम असल्याचे बोलले जाते.