प्रभात वृत्तसेवा चिंचवड – प्रचाराच्या अखेरच्या दिवशी प्रभाग क्रमांक १७ चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या उमेदवारांनी रॅली काढत शक्तीप्रदर्शन केले. नागरिकांकडून यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार मनिषा आरसूळ (अ गट), भाऊसाहेब भोईर (ब गट), शोभाताई वाल्हेकर (क गट) आणि शेखर चिंचवडे (ड गट) यांच्या या रॅलीत मोठ्या संख्येने स्थानिक मतदार सहभागी झाले. रॅलीची सुरुवात प्रेमलोक पार्क येथून झाली. त्यानंतर रॅलीने बिजलीनगर, शिवनगरी, चिंतामणी चौक, भोंडवे वस्ती, वाल्हेकरवाडी गावठाण, चिंचवडेनगर असे मार्गक्रमण केले. ठिकठिकाणी नागरिकांनी उमेदवारांवर पुष्पवृष्टी करत तर कार्यकत्र्यांनी ढोल-ताशाच्या गजरात रॅलीचे स्वागत केले. रॅलीदरम्यान उमेदवारांनी नागरिकांशी संवाद साधत विकास, पारदर्शक कारभार आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर भूमिका मांडली. “सर्वसमावेशक विकास, सामाजिक सलोखा आणि स्थानिक प्रश्नांना प्राधान्य देणे हेच आमचे उद्दिष्ट आहे,” असा विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला. तसेच नागरिकांनी दिलेल्या प्रेमाला आणि पाठिंब्याला योग्य न्याय देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.