प्रभात वृत्तसेवा पिंपरी – प्रभाग क्रमांक २१ मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या वतीने आयोजित बाइक रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. निकिता अर्जुन कदम, संदीप बाळकृष्ण वाघेरे, प्रियंका सुनील कुदळे आणि हिरानंद उर्फ डब्बू आसवानी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या रॅलीमुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. शेकडो कार्यकर्ते, युवक आणि नागरिक मोठ्या संख्येने या बाइक रॅलीमध्ये सहभागी झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे झेंडे, फलक आणि घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. विकासासाठी राष्ट्रवादी, प्रभागाचा सर्वांगीण विकास हाच ध्यास अशा घोषणांनी मतदारांचे लक्ष वेधून घेतले. रॅलीदरम्यान उमेदवारांनी नागरिकांशी थेट संवाद साधत प्रभागातील पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज, आरोग्य, शिक्षण आणि स्वच्छता या मूलभूत प्रश्नांवर ठोस उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. आतापर्यंत केलेल्या विकासकामांचा आढावा घेत, पुढील काळात अधिक पारदर्शक आणि लोकाभिमुख कारभार करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. ही केवळ रॅली नसून विजयाच्या दिशेने टाकलेले एक ठोस पाऊल असल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. नागरिकांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग घेत उमेदवारांचे स्वागत केले. अनेक ठिकाणी फुलांची उधळण, घोषणाबाजी आणि शुभेच्छा देत नागरिकांनी पाठिंबा दर्शविला.