प्रभात वृत्तसेवा पिंपरी – चिखली परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार दौरा उत्साहात पार पडला. घराघरांत जाऊन मतदारांशी थेट संवाद साधत उमेदवारांनी विकासकामांचा आढावा मांडला. या दौऱ्याला विशेषतः महिला मतदारांनी, ‘लाडक्या बहिणींनी’ मोठ्या प्रमाणावर सकारात्मक प्रतिसाद दिला. प्रभाग क्रमांक २ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार रुपाली आल्हाट, अश्विनी जाधव, विशाल आहेर आणि वसंत बोराटे हे आहेत. प्रचारादरम्यान महिलांनी पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य सुविधा, बचतगटांना प्रोत्साहन आणि महिला सुरक्षेसारख्या मुद्द्यांवर आपली मते मांडली. उमेदवारांनीही या प्रश्नांचे निराकरण प्राधान्याने केले जाईल, असे आश्वासन दिले. सरकारच्या विविध योजनांचा लाभ महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची ग्वाही यावेळी देण्यात आली. या प्रचार दौऱ्यात स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. घोषणाबाजी, संवाद आणि प्रत्यक्ष भेटीमुळे वातावरण राष्ट्रवादीमय झाले होते. नागरिकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे पक्षाला चिखली, मोशी,जाधववाडी भागामध्ये चांगला पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसून आले. दरम्यान, प्रचार दौऱ्याच्या शेवटी उमेदवारांनी सर्व मतदारांचे आभार मानत, प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला.