प्रभात वृत्तसेवा पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेने चुकीच्या पद्धतीने प्रभागनिहाय मतदार यादी तयार केल्याने महापालिकेच्या निवडणूक विभाागकडे मोठ्या संख्येने हरकती व सूचना दाखल करण्यात आल्या आहेत. बुधवारी (दि. ३) हरकती दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. या दिवसापर्यंत तब्बल १० हजार २८८ हरकती दाखल करण्यात आल्या आहेत. महापालिकेने पिंपरी, चिंचवड, भोसरी व भोर विधानसभा मतदार संघाची मतदार यादी फोडून १ ते ३२ प्रभागांची प्रारूप मतदार यादी २० नोव्हेंबरला प्रसिद्ध केली आहे. त्या यादीत मोठ्या प्रमाणात त्रुटी आणि चुका आहेत. एका प्रभागातील मतदारांची नावे तसेच, यादी भाग दुसऱ्या प्रभागात जोडण्यात आली आहेत. काही माजी नगरसेवक तसेच, निवडणूक लढणाऱ्यांची नावे गायब झाली आहेत. महापालिका कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे मतदार यादीचा घोळ होऊन गोंधळ उडाला आहे. त्यामुळे राजकीय पक्ष, पदाधिकारी, माजी नगरसेवक, इच्छुक व नागरिकांकडून तक्रारी, हरकती, आक्षेप व सूचना मोठ्या प्रमाणात दाखल केल्या जात आहेत. सर्व आठ क्षेत्रीय कार्यालय व मतदारयादी कक्षाकडे बुधवारी (दि. ३) एका दिवसात एकूण ३ हजार २१६ हरकती दाखल करण्यात आल्या आहेत. तर, २० नोव्हेंबर ते आजअखेर तब्बल १० हजार २८८ हरकती, सूचना व आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. क क्षेत्रीय कार्यालयात सर्वाधिक २ हजार ४६१ हरकती नोंदविण्यात आल्या आहेत. अ क्षेत्रीय कार्यालयात ८१८ हरकती आणि फ क्षेत्रीय कार्यालयात १ हजार ६६८ हरकती प्राप्त झाल्या आहेत. ग क्षेत्रीय कार्यालयात १ हजार ३४५, ह क्षेत्रीय कार्यालयात ७८०, ड क्षेत्रीय कार्यालयात १ हजार ४८०, ब क्षेत्रीय कार्यालयात १ हजार ३०६ आणि ई क्षेत्रीय कार्यालयात ४३० हरकती दाखल करण्यात आल्या आहेत.मतदार यादीत नाव नसल्याबद्दल एकूण २ हजार ७०५ नागरिकांनी हरकतीचा अर्ज भरला आहे. सुमोटो २७५ हरकती दाखल करून घेतल्या मतदार यादीत दुबार तसेच, तिबार नावे असल्याचे आढळून आले आहे. दुबार नावाबाबत आत्तापर्यंत एकूण २३ तक्रारी करण्यात आल्या आहेत. महापालिका निवडणूक विभागाने सुमोटो २७५ हरकती दाखल करून घेतल्या आहेत.