प्रभात वृत्तसेवा पिंपरी – चिंचवडगाव येथील उर्दू शाळेतील मतदान केंद्रावर मतदान प्रक्रियेदरम्यान इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रणेसंदर्भात गोंधळ निर्माण झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. मशाल या निवडणूक चिन्हाचे बटन दाबल्यानंतर कमळ या चिन्हाची लाइट लागत असल्याचा आरोप करण्यात आल्याने मतदान केंद्रावर गोंधळ उडाला. या घटनेची माहिती मिळताच उमेदवारांचे प्रतिनिधी आणि मतदान अधिकाऱ्यांनी तत्काळ आक्षेप नोंदवत निवडणूक प्रशासनाकडे तक्रार केली. यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून काही काळ मतदान प्रक्रिया थांबवण्यात आली. या प्रकारामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होऊन मतदान केंद्र परिसरात गर्दी वाढली होती. घटनेची दखल घेत पोलीस प्रशासन तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.निवडणूक निर्णय अधिकारी आणि तांत्रिक पथकाला तातडीने घटनास्थळी पाचारण करण्यात आले. संशयित मतदान मशीनची तपासणी करून त्याचा तांत्रिक अहवाल घेण्यात आला. नियमांनुसार आवश्यक असल्यास संबंधित मतदान मशीन बदलून मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू ठेवण्याबाबत उमेदवारांच्या प्रतिनिधींनी मागणी केली. या घटनेमुळे काही काळ चिंचवडगाव उर्दू शाळेतील मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया विस्कळीत झाली होती. मात्र प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. त्यानंतर सुरळीत मतदार सुरू झाले. “ज्येष्ठ नागरिकांना कोणते बटन दाबायचे ते लवकर समजले नाही. त्यांनी बटणाच्या जागी बाजूला असलेली खून अनेकवेळा दाबली. त्यामुळे गोंधळ निर्माण झाला. मात्र कोणतेही मशीन बंद झालेले नसून मतदान देखील थांबले नाही. तसेच एका चिन्हासमोरील बटन दाबल्यानंतर दुसऱ्या चिन्हाची लाइट लागणे असे होत नाही. ज्येष्ठ नागरिकांना कोणते बटन दाबायचे ते समजले नाही, त्यामुळे हा गोंधळ झाला होता.” – सचिन पवार, उपआयुक्त