प्रभात वृत्तसेवा पिंपरी – गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भोसरी मतदारसंघात मतदान केलेले असताना, तसेच आगामी महापालिका निवडणुकीसाठी इच्छूक असलेल्या पती-पत्नीचे नाव थेट बारामती आणि इंदापूरमध्ये टाकली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.भोसरी विधानसभेतून नावे वगळून थेट इंदापूर आणि बारामतीमध्ये गेल्याने महापालिका निवडणुकीच्या रिंगणातूनच त्यांचा पत्ता कट झाला आहे. यावरून गंभीर आक्षेप नोंदवत जाणीवपूर्वक केल्याचा आरोप त्यांनी केला असून यामुळे राजकीय वातावरण तापले आहे.राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) युवक शहराध्यक्ष इमान शेख यांच्या आई-वडिलांच्या नावांबाबत हा प्रकार घडला आहे. या संदर्भात त्यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक विभाग व राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, आगामी महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग ८ मधून माझे वडील युनूस शेख आणि प्रभाग क्रमांक ९ मधून माझी आई राबिया शेख इच्छुक आहेत. दोघांपैकी एकाला पक्षाकडून उमेदवारी दिली जाणार होती.दरम्यान, प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना असंख्य घोळ झाले आहेत. त्यापैकी एक गंभीर प्रकार आमच्या निदर्शनास आला आहे. आई राबिया यांचे मतदान बारामती विधानसभेतील शिरसुफळ येथे गेले आहे. तर वडील युनूस शेख यांचे मतदान इंदापूर विधानसभेत टाकले गेले आहे. मागील ३५ वर्षापासून आमचे कुटुंब पिंपरी-चिंचवडमध्ये आहे. आम्ही पत्ता बदल करण्यासाठी कोणताही अर्ज केलेला नाही. मात्र, परस्पर त्यांचे मतदान बारामती व इंदापूर मतदारसंघात टाकले आहेत. त्यामुळे इच्छूक असून देखील आई-वडिलांना पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक लढता येणार नसल्याचे शेख यांनी म्हटले आहे. तर यादी दखल राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी देखील घेतली असून निवडणूक आयोग व राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. “मी चार वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेसचा युवक शहराध्यक्ष आहे. आई-वडिल निवडणुकीसाठी इच्छूक असून आम्ही तशी तयारी केली. पक्षाकडून त्यांना उमेदवारीसाठी प्रयत्न सुरु होते. तसे असताना मतदार यादीत घोळ करून त्यांच्या निवडणूक लढण्याच्या अधिकारावर गदा येणार आहे. या प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई झाली पाहिजे.” – इम्रान शेख, शहराध्यय़क्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरद पवार)