प्रभात वृत्तससेवा पिंपरी – आगामी पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीची औपचारिक घोषणा अद्याप व्हायची असली तरी राजकीय वातावरण तापू लागले आहे. मात्र, उमेदवारीपूर्व रिंगणात इच्छुकांची प्रचंड मोठी संख्या राजकीय पक्षांची परीक्षा घेणारी ठरत आहे. सोशल मीडिया, बॅनर, कटआऊट आणि डिजिटल प्रचाराची हवा करून इच्छुकांनी जोरदार वातावरण निर्मिती केली आहे. परंतु प्रभाग पातळीवर जनतेशी नाळ जुळविणाऱ्या नेत्यांना शोधणे पक्षांसाठी आव्हान ठरणार आहे.पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रत्येक प्रभागात ‘डिजिटल उमेदवारी’ची लाट उसळली आहे. नाक्यानाक्यावर बॅनर, फलक, होर्डिंग्ज आणि सोशल मीडियावरील व्हायरल पोस्टनी राजकारणाचा चेहरा बदलून टाकला आहे. ‘मीच उमेदवार’ अशी घोषणा करत अनेकजण फक्त डिजिटल उपस्थितीच्या जोरावर उमेदवारी गाजविण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, या चमकधमक मागे नेतृत्वगुणांचा अभाव हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिका निवडणुकांसाठी इच्छुकांची संख्या वाढत असली, तरी पक्षांच्या उच्चपदस्थांकडे मात्र ‘योग्यता’ हा मापदंड सांभाळून उमेदवार निवडण्याचे आव्हान अधिकच कठीण झाले आहे. अनेकांकडे सोशल मीडियावरील चाहतावर्ग, बॅनरची ताकद आणि चमकदार प्रतिमा असली, तरी ते जमिनीवरील कार्यकर्त्यांशिवाय पोकळ असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.निवडणुका जाहीर झाल्यावर वास्तवाचा धक्का बसण्याची शक्यता मोठी असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. अनेक डिजिटल उमेदवारांना पक्षाकडून अधिकृत मान्यता मिळेलच याची खात्री नाही. स्थानिक संघटनांचे अहवाल, शहर पातळीवरील नेतृत्वाचे सर्वेक्षण आणि मतदारसंघातील प्रत्यक्ष स्थिती तपासल्यानंतर अनेकांची नावे सूचीबाहेर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आज सोशल मीडियावर जोरदार उपस्थिती दाखवणाऱ्यांपैकी जवळपास निम्म्याहून अधिक जण उमेदवारीतून ‘डिलिट’ होणार असल्याची चर्चेला उधाण आले आहे. खरा प्रश्न—नेतृत्व आणि विश्वास प्रभाग पातळीवर लोकांशी नाळ जुळ.िवणारे, सर्व घटकांना एकत्र ठेवणारे आणि निर्णयक्षम नेतृत्व दाखवणारे चेहरे कमी होत चालले आहेत. फेसबुक-इंस्टाग्रामवर ‘लाइक’ आणि ‘फॉलोअर्स’ वाढवणाऱ्या अनेकांना वॉर्डातील मतदारांकडून प्रत्यक्ष प्रश्नांना उत्तर देताना मात्र मौन धारण करावे लागत असल्याची टीका कार्यकर्त्यांतून होत आहे. नेत्यांची चिंता वाढली पक्षात गटबाजी, सत्तेची समीकरणे आणि वरच्या पातळीवरील दबावामुळे योग्य उमेदवार शोधण्यात पक्षनेते अडचणीत आहेत. तळागाळात काम करणाऱ्यांना न्याय देण्याची इच्छा जाहीरपणे असली, तरी प्रत्यक्षात ‘चमकदार’ वातावरण तयार करणाऱ्यांचे नाव पुढे येताना अनेकदा दिसते. अशा परिस्थितीत मतदारांचा कल ओळखण्यात चूक होण्याचा धोका वाढतो व त्याचा परिणाम निवडणूक निकालात दिसू शकतो, अशी भीती काही ज्येष्ठ नेत्यांनी व्यक्त केली आहे. या निवडणुका ठरणार वास्तविकतेची कसोटी बॅनर, सोशल मीडियाचा गाजावाजा, डिजिटल चमक आणि राजकीय प्रतिमांच्या स्पर्धेत या महापालिका निवडणुका हे नेतृत्वाचे खरे मोजमाप करणारे व्यासपीठ ठरणार आहेत. ‘हवेतला नेता’ आणि ‘जमिनीवरील नेता’ यातला फरक या निवडणुकांनंतर अधिक स्पष्ट दिसेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.