प्रभात वृत्तसेवा दापोडी – आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ३० मधील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार संजय नाना काटे, उषा मुंढे, प्रतिभा जवळकर आणि चंद्रकांता सोनकांबळे यांनी जनसंपर्क अभियान तीव्र केले असून, नुकताच त्यांनी परिसरातील विविध चाळी आणि वस्त्यांमध्ये जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधला. उमेदवारांनी एसएमएस कॉलनी नंबर १, काळुराम काटे चाळ, पत्रा चाळ, कुलकर्णी चाळ, कांबळे चाळ, शिनगारे चाळ, जय भवानी चाळ, बबन काटे चाळ, आबा काटे चाळ आणि आतार वीट भट्टी या भागातील रहिवाशांच्या गाठीभेटी घेतल्या. यावेळी स्थानिक मुस्लिम भगिनींनी उमेदवारांकडे मुलांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी दापोडी-बोपोडी पुलाजवळील परिसरात एक सुसज्ज उद्यान उभारण्याची आग्रही मागणी केली. सध्या दापोडीत असलेले महापालिकेचे उद्यान सुस्थितीत नसल्याचे सांगत, नागरिकांनी आपल्या व्यथा मांडल्या. विशेषतः दापोडी-बोपोडी पूल अरुंद असल्याने आणि या रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ असल्याने लहान मुले व वृद्धांना रस्ता ओलांडून पलिकडे जाणे अत्यंत कठीण व धोकादायक ठरत आहे. त्यामुळे रहिवासी क्षेत्राच्या जवळच एखादे चांगले उद्यान असावे, अशी मागणी करण्यात आली. नागरिकांच्या या समस्या ऐकून घेतल्यानंतर संजय नाना काटे आणि इतर उमेदवारांनी या मागणीची गांभीर्याने दखल घेतली. “आम्हाला सेवा करण्याची संधी मिळाल्यास आम्ही प्राधान्याने या संदर्भात पाठपुरावा करू आणि आवश्यक पुढाकार घेऊन परिसराचा कायापालट करू,” असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. या प्रचार मोहिमेत फर्जना शेख, रूबीना शेख, नसरीन खान, सिमरन खान, समीना सय्यद, परविण सय्यद, शबाना कारी, अंजुम शेख, रुकसाना शेख, मुस्कान खान, हसीना शेख, जुबेदा शेख, कासिम शेख, बाबुलाल खान, अफसर खान, ऐरार सय्यद, इसाक खान, रहमान खान, अन्सार खान आणि शरीफ शेख यांच्यासह मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक उपस्थित होते. सर्वच ठिकाणी उमेदवारांचे उत्साहात स्वागत करण्यात आले असून, या दौऱ्यामुळे प्रभागातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे दिसून येत आहे.