प्रभात वृत्तसेवा पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १८ (ड) मधून भाजपचे उमेदवार सुरेश भोईर यांनी पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात दमदार एन्ट्री घेतली आहे. त्यांचा प्रचार सध्या जोरात सुरू आहे. मागील महापालिका निवडणुकीत शहरातून सर्वाधिक मतांनी विजय मिळवणाऱ्या भोईर यांना यंदाही विक्रमी मतांनी निवडून आणले जाईल, असा विश्वास त्यांचे समर्थक व्यक्त करत आहेत. सुरेश भोईर हे गेल्या सात वर्षांपासून गोरगरीब रूग्णांना आपल्या कार्यालयातून मोफत आरोग्य सेवा देत आहेत.‘आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा’ या भावनेतून सुरेश भोईर यांनी आपल्या कार्यालयातच आठवड्यातून तीन दिवस होमिओपॅथिक दवाखाना सुरू केला आहे. या दवाखान्यात नामवंत डॉक्टरांकडून रुग्णांवर उपचार केले जात असून, परिसरातील नागरिकांना याचा मोठा लाभ होत आहे. चिंचवडमधील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी तालेरा रुग्णालय उभारणीसाठीही त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. आमदार शंकर जगताप यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिराला चिंचवड गावातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. तसेच करोना काळात प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी काढा व औषधांचे वितरण करून भोईर यांनी सामाजिक बांधिलकी जपली. विकासासोबत माणुसकीचा हात देणारे नेतृत्व म्हणून सुरेश भोईर यांच्याकडे मतदारांचे लक्ष वेधले जात आहे.