प्रभात वृत्तसेवा पिंपरी – महापालिका निवडणुकीची घोषणा होताच पिंपरी चिंचवड शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. सर्वच पक्षांतील इच्छुकांनी उमेदवारी मिळविण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे. भाजपसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, आरपीआय, वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना या प्रमुख पक्षांकडे इच्छुकांची संख्या मोठी असल्याने बंडखोरीची भीती वाढली आहे. ही बंडखोरी रोखण्यासाठी सर्वच पक्ष उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम मुदतीच्या अगदी आधी, म्हणजे २८ व २९ डिसेंबर रोजी उमेदवारी याद्या जाहीर करण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत.महापालिका निवडणुकीसाठी मनसे, भाजपमध्ये इच्छुकांच्या मुलाखती सुरू झाल्या असून, काँग्रेसच्या इच्छुकांच्या मुलाखतीही लवकरच सुरू होणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट व शरदचंद्र पवार गट) तसेच शिवसेनेकडूनही इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत. जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याच्या उद्देशाने उमेदवार निवडताना पक्षांकडून मोठी जुळवाजुळव केली जात असल्याचे चित्र आहे. एका जागेसाठी चार-पाच इच्छुक यंदा काहीही झाले तरी निवडणूक लढविणारच, असा निर्धार करीत अनेक बाहुबली उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. पिंपरी चिंचवडमधील अनेक प्रभागांत एका जागेसाठी चार ते पाच इच्छुक असल्याने प्रमुख पक्षांमध्ये बंडखोरीची शक्यता अधिक आहे. त्यामुळे पक्ष नेतृत्वाची कसोटी लागणार असून, नाराजी कशी सांभाळली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपमध्ये इच्छुकांचा महापूर भाजपचे शहरात दोन विधानसभेचे आमदार असून दोन विधान परिषदेवर आमदार म्हणून नियुक्त झाले आहेत. भाजपकडे इच्छुकांची संख्या सर्वाधिक आहे. उमेदवारी अर्जाचे वाटप झाले असले तरी अनेकजण सेंटींग लागून भाजपच्या उमेदवारीसाठी टपून बसले आहेत. उमेदवारीची सर्वाधिक मागणी ही भाजपकडे असून त्याखालोखाल राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष (अजित पवार गट) या पक्षाच्या उमेदवारीलाही मागणी आहे. निष्ठावंतांमध्ये अस्वस्थता महापालिका निवडणुकीसाठी अनेक माजी नगरसेवकांचे आप्तस्वकीय, स्नेही यांची नावे इच्छुक म्हणून पुढे येऊ लागल्याने जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. काही निष्ठावंतांनी पक्षांतर किंवा बंडखोरीचा पर्याय खुलेपणाने चर्चेत आणल्याने सर्वपक्षीय आमदार व वरिष्ठ नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे. घराणेशाहीला थारा नको, असा दावा करणाऱ्या पक्षांकडून प्रत्यक्षात कोणाला उमेदवारी दिली जाते, याबाबत शहरात उत्सुकता आहे.