प्रभात वृत्तसेवा पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेचा गड मिळविण्यासाठी भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेसने युद्ध छेडले आहे. दोन्हीही पक्षांचे सेनापती लढाईत उतरले असून एकमेकांवर आरोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. शक्रवारी (दि. २) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत भाजपच्या पाच वर्षाच्या सत्ताकाळात झालेल्या भ्रष्टाचाराची पुराव्यानिशी पोलखोल केली. तर दहशत माजवून भ्रष्टाचार करणाऱ्या राक्षसांचे दहन करणार असल्याचा इशारा पवार यांनी दिला. त्यानंतर भाजपचे शहराध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी शहरात येत त्यांच्या आरोपांना उत्तर दिले. त्यामुळे राजकीय वातावरण तापले असून मतदानापर्यंत आता एकमेकांविरोधत आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा उडणार आहे.पिंपरी चिंचवड महापालिका हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बालेकिल्ला मानला जात. मात्र, २०१७ ला पवार यांच्या हातातून सत्ता गेली. २०२२ पर्यंत महापालिकेवर भाजपाची सत्ता होती. तर त्यानंतर प्रशासकीय राजवट होती, मात्र, सगळा कारभार राज्य सरकारच्या नियंत्रणात सुरू असल्याने अप्रत्यक्षपणे पालिका भाजपाच्या ताब्यात होती. या नऊ वर्षांच्या काळात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप अजित पवार यांनी केला. शहरामध्ये खोदाई माफिया तयार झाला असून मोठ्या प्रमाणावर गुंडगिरी वाढल्याचा आरोप पवार यांनी केला. तर कुत्र्यांच्या नसबंदीत, जॅकवेल काम, कचऱ्याचे बायोमायनिंग, अर्बन स्ट्रीट, स्मार्ट सिटी यामध्ये मोठा घोटाळा झाला असल्याचे आरोप त्यांनी केले. एवढेच नाही तर काही प्रकरणे पुराव्यानिशी सादर करत आणख सगळ्या प्रकरणांचे पुरावे असून योग्यवेळी सादर करणार असल्याचा इशारा दिला. यावेळी त्यांनी भाजपमधील कोणाचे नाव घेतले नसले तरी अप्रत्यक्षपणे हे आरोप भाजप आमदार महेश लांडगे यांच्यावरच होते.एरवी, भाजपवर आरोप झाल्यानंतर तातडीने पुढे येत ते आरोप खोडून काढणाऱ्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मात्र यावेळी सबुरीने घेतले. भाजपने प्रदेशाध्यक्षांनाच प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी बोलवत अजितदादांनी केलेल्या आरोपांची हकीकत त्यांना सुनावली. राष्ट्रावादी काँग्रेसने आरोपाच्या इतक्या फैरी झाडल्यानंतर भाजप शांत बसणे अशक्यच होते. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी शनिवारी (दि. ३) प्रचाराचा शुभारंभ करत अप्रत्यक्षपणे अजित पवारांवर तोफ डागली. तर भोसरीच्या पैलवानाच्या नादाला लागायचे नाही असा इशारा देत नव्या वादाला तोंड फोडले.