प्रभात वृत्तसेवा दापोडी – प्रभाग क्रमांक ३० मधील भारतीय जनता पक्ष आणि रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) महायुतीचे उमेदवार चंद्रकांता सोनकांबळे, उषा मुंढे, प्रतिभा जवळकर आणि संजय नाना काटे यांच्या प्रचारार्थ दापोडी-फुगेवाडी परिसरात पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत आमदार अमित गोरखे आणि आमदार शंकर जगताप देखील उपस्िथत होते. या पदयात्रेच्या माध्यमातून दापोडी परिसरातील सामाजिक एकतेचे देखील दर्शन घडले. ग्रामदैवत फिरंगाई देवी मंदिरात सामूहिक आरती करून पदयात्रेचा उत्साहात प्रारंभ झाला. यावेळी आमदार अमित गोरखे यांच्या हस्ते परिसरातील महापुरुषांच्या स्मारकांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यामध्ये क्रांतिवीर भगतसिंग, क्रांतिवीर दाभाडे, नरवीर तानाजी मालुसरे, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकांचा समावेश होता. ही पदयात्रा सिद्धार्थनगर, पवार वस्ती, एसएमएस कॉलनी, फुगेवाडीतील आझाद चौक आणि संजय नगर अशा विविध मार्गांवरून काढण्यात आली. गावठाणातील अरुंद गल्ल्यांपासून ते मुख्य चौकांपर्यंत उमेदवारांनी मतदारांशी थेट संवाद साधला. ठिकठिकाणी महिलांनी उमेदवारांचे औक्षण करून स्वागत केले, तर तरुणांच्या घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता. प्रचारादरम्यान त्रैलोक्य महासंघ बुद्ध विहार, लक्ष्मी चौक, जोली क्लब आणि फुगेवाडीतील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरासह विविध धार्मिक स्थळांना भेट देऊन उमेदवारांनी आशीर्वाद घेतले.या पदयात्रेत सुनिता अडसुळे, संचिता जाधव, शिरीन पठाण, सत्यवान काटे, गजानन काटे, शैलेश काटे, महेश काटे, राजेंद्र काटे, गणेश शिंदे, प्रमोद जांभूळकर, वाळकोली, सुनिल कांदळकर, किशन मिसाळ, शैलेश कांबळे, लता लगाडे, कविता कांबळे, ज्योती कांबळे यांसह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते