प्रभात वृत्तसेवा पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी १५ जानेवारीला मतदान होत आहे. त्यासाठी अर्ज स्वीकृती, छाननी, अर्ज माघार ही प्रक्रिया पूर्ण झाली असून शहरातील लढतींचे चित्र स्पष्ट झाले आहे. शहरामध्ये ४४३ उमेदवारांनी माघार घेतली असून आता निवडणुकीच्या रिंगणात ६९२ उमेदवार असणार आहेत. तर प्रभागामध्ये कोण कोणाच्या विरोधात असणार याचे देखील चित्र स्पष्ट झाले आहे. पुढील अकरा दिवस शहरामध्ये प्रचाराचा धुरळा उडणार असून प्रत्यक्ष १५ जानेवारीला मतदान होणार असून १६ जानेवारीला निकाल लागणार आहे.महापालिका निवडणुकीसाठी शहरामध्ये ३२ प्रभागातून १२८ नगरसेवक निवडायचे आहेत. त्यासाठी शहरातील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अप) आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना (शिंदे), शिवसेना (उबाठा), मनसे, आप या पक्षांसह अपक्ष उमेदवार देखील रिंगणात आहेत. अर्ज माघारी नंतर आता प्रभागांचे चित्र स्पष्ट झाले आहे. दरम्यान, अर्ज माघारीच्या शेवच्या दिवशी नेत्यांचा कस लागला होता. ३२ प्रभागांमधून मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झाल्याने अनेक अपक्षांनी अर्ज दाखल केले होते. या बंडोबांना थंड करण्यासाठी पक्षाचे आमदार, शहराध्यक्ष यांनी बंडोबांच्या घरचा रस्ता धरला होता. अनेक विनवण्या आणि राजकीय पुनर्वसन करण्याचे आश्वासन देत त्यांना अर्ज मागे घेण्यासाठी गळ घालण्यात आला. त्याला काही बंडखोरांनी प्रतिसाद देत अर्ज मागे घेतले.मात्र, काही लढण्याच्या भूमिकेवर ठाम होते. त्यांनी नेत्यांच्या फोनला प्रतिसाद न देता दुपारी चार वाजेपर्यंत थेट बाहेरगावी राहणे पसंत केले. त्यामुळे त्यांचे अर्ज मागे न घेता ते निवडणुकीच्या रिंगणात असणार आहे. भाजपमध्ये अशा बंडखोरांची संख्या सर्वाधिक आहे. अनेक प्रभागांमध्ये भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस एकमेकांच्या समोर असणार आहे. अर्ज माघारी नंतर याबाबत चित्र स्पष्ट झाले आहे. आता १३ जानेवारी मध्यरात्री पर्यंत प्रचार करण्यासाठी वेळ असणार आहे. त्यासाठी शहरातील ३२ प्रभागांमध्ये प्रचाराचा धुरळा उडणार असून रॅली, पदयात्रेने संपूर्ण शहर ढवळून निघणार आहे. प्रभाग २४ मध्ये राष्ट्रवादी शिवसेना मैत्रीपूर्ण प्रभाग २४ मध्ये खासदार श्रीरंग बारणे यांनी त्यांचा मुलगा व पुतण्याला शिवसेनेची उमेदवारी दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार श्रीरंग बारणे यांची चर्चा झाल्यानंतर याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने मैत्रीपूर्ण लढाई करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार संतोष बारणे यांनी माघार घेतली आहे. तर त्याठिकाणी शिवसेनेचे असलेले विश्वजीत बारणे यांना पाठिंबा देण्यात येणार आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खुलासा केला. मात्र, शहरात इतर जागांवर शिवसेना व राष्ट्रवादी आमने सामनेच असणार आहे. कोण किती जागांवर -भाजप-रिपाइ – १२८, -राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार, शरद पवार- १२८, -शिवसेना (उबाठा) ५९ -शिवसेना (शिंदे) – ६९ -कॉग्रेस – ५२ -मनसे – १७ -आप – ३५