PCMC Election 2026 – महापालिका निवडणुकीच्या प्रचारात महिनाभर उमेदवारांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी गल्ली-बोळ पिंजून काढले होते. प्रत्येक घर आणि प्रत्येक मतदारापर्यंत पोहचण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता. साम, दाम, दंड भेद सर्वाचा वापर करत विजयश्री खेचून आणण्याचा प्रयत्न झाला होता. परंतु तरीही अनेकांना पराभवाचा सामना करावा लागला तर काही विजयी झाले परंतु मतमोजणी फेऱ्यांमध्ये अनुभवलेला मताधिक्याचा चढ-उतार रक्तदाब वाढविणारा होता. हे असे का काढले? यावर आता मंथन सुरू असून बूथनिहाय आकडेवारीचा अक्षरश: खिस काढला जात आहे. प्रयत्न कुठे कमी पडले? कुठे दगा-फटका झाला? याचे अंदाज बांधले जात आहेत.मतदारांना मतदानासाठी प्रवृत्त करण्यासाठी घरभेटी, प्रचारफेर्या, कार्यकर्त्यांची फौज आणि विविध स्वरूपातील रसद यांचा वापर करण्यात आला. मात्र, तरीही अल्प मतांनी पराभव स्वीकारावा लागलेल्या उमेदवारांमध्ये आता एकच चर्चा सुरू आहे – मतदान नेमके कुठे कमी पडले? पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रत्येक प्रभागातून चार सदस्य निवडून द्यायचे असल्याने बहुतांश प्रभागांत आठ ते सोळा उमेदवार रिंगणात होते. महायुती, महाविकास आघाडीबरोबरच विविध लहान-मोठ्या पक्षांचे आणि मोठ्या संख्येने अपक्ष उमेदवारांनीही नशीब आजमावले. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात काही ठिकाणी जेवणावळी, मोटारसायकल रॅली, शेकडो कार्यकर्त्यांची फौज उभी करत जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. याच काळात काही उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणावर रसद पुरवली गेल्याची चर्चा रंगली. बहुतेक उमेदवारांकडे प्रभागनिहाय, गल्ली-निहाय मतदारसंख्या, खर्चाचे अंदाज आणि प्रचाराचा तपशीलवार हिशोब तयार आहे. विजयी उमेदवारांसाठी हा मुद्दा गौण असला, तरी सर्व काही करूनही पराभव पत्करावा लागलेल्या उमेदवारांमध्ये अस्वस्थता स्पष्टपणे दिसून येत आहे. बुथनुसार आकडेवारी मिळताच हिशोबाला सुरूवात विधानसभा व लोकसभा निवडणुकांप्रमाणे महापालिका निवडणुकीत मतदान केंद्रनिहाय सविस्तर आकडेवारी मतमोजणीनंतर चार दिवसांनी उपलब्ध झाली आहे. केंद्रावर एकूण किती मतदान झाले, त्यापैकी आपल्याला किती मतदान मिळाले. प्रतिस्पर्धी उमेदवाराला कितीचा लीड मिळाला, पॅनलमधील इतरांना किती मते मिळाली. पिंपरी चिंचवड निवडणूक रसद देऊनही नेमक्या कुठल्या परिसरातून अपेक्षित मतदान झाले नाही, हे ठरवणे पराभूत उमेदवारांसाठी अवघड ठरत आहे. काही ठिकाणी मतदारांनी मतदानच केले नाही, आपले कार्यकर्ते मतदारांपर्यंत पोहचले नाहीत की पोहचूनही मतदारांच्या अपेक्षांची पूर्तता केली नाही? असे प्रश्न उपस्िथत होत आहेत. जबाबदार कोण? पहिला, दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळवलेल्या उमेदवारांतील मतांचा फरक पाहून काही भागांत मतदान कमी झाले असावे, असा अंदाज बांधला जात आहे. यासाठी काही उमेदवारांनी आपल्या विश्वासू कार्यकर्त्यांकडून ठराविक गल्ल्यांतील घराघरांत चौकशी सुरू केली आहे. कोणत्या घरातून मतदान झाले, कोणाला आणि किती वाजता झाले, याचा ताळमेळ घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, प्रचारात अखेरच्या सत्रात पुरविण्यात आलेली रसद वाटप सांभाळणार्यांवरच संशयाचे सावट आहे. ठराविक संख्येने मतदार आणून देतो, असे सांगून मोठ्या प्रमाणावर रसद उचलण्यात आली होती; मात्र ती प्रत्यक्षात मतदारांपर्यंत पोहोचली का, आणि किती प्रमाणात पोहोचली, याचा हिशेब आता घेतला जात आहे. काही ठिकाणी जिथे रसद नाही, तिथे मते नाहीत, अशीच स्थिती निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. यामुळे, पराभवामागचे नेमके कारण ठरवणे सध्या तरी शक्य नसले, तरी येत्या काही दिवसांत प्रत्येक प्रभागात सूक्ष्म अभ्यास करून उमेदवारांकडून आत्मपरीक्षण सुरू राहणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.