प्रभात वृत्तसेवा पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ३२ प्रभागांत १२८ पैकी १२६ जागांसाठी आज (दि. १५) मतदान होणार आहे. दोन उमेदवार बिनविरोध झाले आहेत. यामुळे १२६ जागांसाठी ६९२ उमेदवार रिंगणात आहेत. १७ लाख १३ हजार ८९१ मतदार या उमेदवारांचे भवितव्य ठरवतील.पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी ३२ प्रभागांत १२८ जागा असून, ६९२ उमेदवार रिंगणात आहेत. प्रभाग क्रमांक ६ व १० मधून अनुक्रमे भाजपचे रवी लांडगे आणि सुप्रिया चांदगुडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे आता १२६ जागांसाठी मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी १० हजार ३३५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ३२ प्रभागात एकूण २ हजार ६७ मतदान केंद्रांवर ७ हजार १४९ मतदान यंत्र (बॅलेट यूनिट), तर २ हजार ९०० कंट्रोल युनिट आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर १ केंद्राध्यक्ष, ३ मतदार अधिकारी, १ शिपाई असेल.महापालिका क्षेत्रातील एकूण मतदार संख्या १७ लाख १३ हजार ८९१ इतकी असून यामध्ये ९ लाख ५ हजार ७२८ पुरुष, ८ लाख ७ हजार ९६६ स्त्रिया आणि १९७ इतर मतदारांचा समावेश आहे. प्रभाग क्रमांक १६ हा ७५ हजार १०५ मतदारांसह सर्वाधिक मतदारांचा प्रभाग असून प्रभाग क्रमांक २३ मध्ये सर्वात कमी म्हणजे ३३ हजार ३३ मतदार आहेत.