प्रभात वृत्तसेवा पिंपरी – पुणे ग्रँड चॅलेंज टूर-२०२६ आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेच्या चौथ्या टप्प्याच्या अनुषंगाने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील स्पर्धा मार्गावरील सर्व सरकारी व खासगी शाळा शुक्रवारी (दि. २३) दुपारी १२ वाजेपर्यंत सुरु ठेवाव्यात; त्यांनतर शाळा बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डूडी यांनी जारी केले आहेत. टप्पा क्रमांक चार अंतर्गत छत्रपती शिवाजी स्टेडियम, बालेवाडी येथून स्पर्धेला सुरुवात होणार असून ती पुणे शहरहद्दीत जावून परत राजीव गांधी ब्रिजमार्गे पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीत प्रवेश करणार करुन सांगवी, वाकड, निगडी, त्रिवेणीनगर, भोसरी, चिखली, पिंपरी, काळेवाडी परिसरातून फिरुन परत राजीव गांधी ब्रिज मार्गे पुणे शहर हद्दीत प्रवेश करणार आहे. ही स्पर्धा सुरळीत व सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी तसेच नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी स्पर्धा मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश करण्यास मनाई करण्यात आलेली असून वाहतूक पर्यायी मार्गान वळविण्यात आलेली आहे. तसेच या मार्गावरील शाळांना दुपारी बारा वाजल्यानंतर सुट्टी देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या परिसरातील शाळांसाठी निर्देश विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी स्पर्धा मार्गावरील सांगवी, वाकड, रावेत, ताथवडे, पुनावळे, निगडी प्राधिकरण, इंद्रायणीनगर, चिंचवड एम.आय.डी.सी, चिखली, काळेवाडी, भोसरी एम.आय.डी.सी., यशवंतनगर पिपरी, त्रिवेणीनगर या परिसरातील सर्व शासकीय व खासगी शाळा दुपारी १२ वाजेनंतर बंद करण्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.