प्रभात वृत्तसेवा चिखली – दुबई येथे नुकत्याच पार पडलेल्या ओशन मॅन ओपन वॉटर वर्ल्ड फायनल चॅम्पियनशिप या आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित सागरी जलतरण स्पर्धेत पिंपरी-चिंचवड शहरातील पाच भारतीय जलतरणपटूंनी उल्लेखनीय कामगिरी करत देशाचा नावलौकिक वाढवला. या स्पर्धेत तब्बल ६८ हून अधिक देशांतील ८८६ आंतरराष्ट्रीय दर्जाचे जलतरणपटू सहभागी झाले होते. या जागतिक स्पर्धेत पिंपरी-चिंचवडच्या जलतरणपटूंनी विविध वयोगटांत उत्कृष्ट यश संपादन केले. ज्ञानदेव घोडेकर यांनी ७० वर्षांवरील वयोगटात कांस्यपदक पटकावले, तर रामराव मासुळकर यांनी ६० वर्षांवरील वयोगटात कांस्यपदकाची कमाई केली. गिरीश मुळक (३०+ वयोगट) यांनी टॉप १० मध्ये स्थान मिळवले, तर सुनील ननवरे (५०+ वयोगट) आणि विराज गिरी (२५+ वयोगट) यांनी टॉप २० मध्ये स्थान मिळवत भारताचा मान उंचावला आहे. ही स्पर्धा अत्यंत कठीण आणि उच्च दर्जाची असून ऑलिम्पिक स्तरावरील खेळाडूंचाही सहभाग होता. काही आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी जवळपास अर्ध्या वेळेत शर्यत पूर्ण केली. अशा आव्हानात्मक वातावरणातही शहरातील दोन खेळाडूंनी कांस्यपदक जिंकत आपली क्षमता सिद्ध केली. जागतिक दर्जाच्या जलतरणपटूंशी थेट स्पर्धा करण्याचा अनुभव, स्वतःच्या मर्यादा ओळखणे आणि पुढील स्पर्धांसाठी सुधारणा करण्याची संधी मिळाल्याचे सर्व खेळाडूंनी सांगितले. या अनुभवातून आम्ही खूप काही शिकलो असून, पुढील वेळी अधिक भक्कम तयारीनिशी परत येऊ, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.या यशामागे आमदार महेश लांडगे, माजी महापौर वैशाली घोडेकर, पी. डी. पाटील, सिल्व्हराईज ग्रुपचे संचालक संतोष बारणे, सिल्वर फिटनेस क्लबचे मॅनेजिंग डायरेक्टर महेश गणगे, तसेच सिल्वर फिटनेस क्लबचे कर्मचारी-सभासद संभाजी करपे, संभाजी सोनवणे, मनोज मांजरे, आनंद मिश्रा, सँडविक एशिया कर्मचारी वर्ग, सिनेकोरॉन इंडिया डायरेक्ट दीपक झांबरे यांचे सहकार्य लाभले. त्यांच्या प्रोत्साहनामुळेच खेळाडूंना जागतिक मंचावर सर्वोत्तम कामगिरी करता आली, असे मत व्यक्त करण्यात आले.