प्रभात वृत्तसेवा पवनानगर – सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटननगरी लोणावळा-खंडाळा आणि मावळातील पवना धरण परिसरासह सर्वच पर्यटनस्थळे पर्यटकांच्या गर्दीने गजबजलीसकाळपासूनच मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेसह जुन्या मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर दिवसभर वाहतूक संथगतीने सुरू होती. दुपारनंतर वाहनांची संख्या वाढू लागली. सायंकाळला सुरूवात होताच पर्यटक पवना धरण परिसरातील पर्यटन स्थळांसह मावळातील विविध पर्यटन स्थळांवर २०२५ या सरत्या वर्षाचा सुर्यास्त पहाण्यासाठी पर्यटकांनी गर्दी करत आपल्या मोबाइलवर सुर्यास्ताची छबी टिपत होते.सर्व ऋतूत पर्यटनासाठी नावलौकिक असणाऱ्या पवन मावळातील पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक येतात. पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळ्यातही पर्यटकांचा ओघ कायम असतो. मागील काही वर्षांपसून नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला (थर्टीफस्ट) सरत्या वर्षाला निरोप देत आणि नवीन वर्षाचे स्वागत धुमधडाक्यात करण्याची मोठी क्रेझ नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. मागील आठ दहा वर्षांपासून पवनाधरण परिसरासह मावळातील इतर जलाशयाच्या कृषी पर्यटन स्थळांवर निर्माण झालेल्या टेंट हाऊसची क्रेझ दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यामुळे इतर ठिकाणच्या पर्यटन स्थळांवर मिळणाऱ्या सोयी सुविधांपेक्षा कृषी पर्यटन केंद्रावर अल्प दरात उत्तम व चांगल्या पद्धतीने सोयी सुविधा मिळत आहे. तसेच ही सर्व पर्यटन स्थळे निसर्गरम्य वातावरणात जलाशयाच्या काठावर असल्याने याठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटकांचा कल वाढत आहे. मावळातील सर्वच कृषी पर्यटनस्थळे पर्यटकांनी अक्षरशः गजबजली आहे. मावळातील पर्यटनस्थळ परिसरातील हॉटेल्स, बंगले, फार्महाऊस, जलाशयाच्या काठावर कृषी पर्यटन केंद्रावरील टेंट हाऊसची बुकिंगही समाधानकारक झाली आहे. विशेषतः पवना धरण परिसरासह मावळातील इतर जलाशयाच्या काठावरील कृषी पर्यटन केंद्र येथील टेंट हाऊसला सर्वाधिक पसंती आहे. पर्यटकांनी बुधवारी दिवसभर कार्ला, भाजे लेणी, पवना, मळवंडी ठुले, भुशी, लोणावळा, तुंगार्ली, वलवण, कासारसाई या जलाशय परिसरासह लोहगड, विसापूर, तुंग, तिकोना, राजमाची व कोराईगड या गडकिल्ले परिरात मोठ्याप्रमाणात पर्यटकांनी गर्दी केली होती.