प्रभात वृत्तसेवा वडगाव मावळ – राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे जिल्हा (ग्रामीण) अध्यक्षपदी मावळ तालुक्यातील ज्येष्ठ नेते विठ्ठलराव शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी ही नियुक्ती जाहीर केली आहे. या नियुक्तीमुळे मावळ तालुक्याला जिल्ह्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी शिंदे यांच्यावर पक्षातील निष्ठावंत आणि संयमी नेतृत्वामुळे विश्वास टाकत जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. या माध्यमातून मावळ, मुळशी, भोर आणि राजगड या चार तालुक्यांची संघटनात्मक जबाबदारीही त्यांच्याकडे देण्यात आली आहे. आमदार सुनील शेळके यांनीही शिंदे यांच्या नियुक्तीबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेली शिंदे यांची निवड पक्षाच्या दृष्टीने फायदेशीर ठरणार असल्याची चर्चा आहे.नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव शिंदे यांनी यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्ष, जिल्हा सरचिटणीस अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. इंदोरी ग्रामपंचायतीचे सरपंच ते मावळ पंचायत समितीचे सभापती अशी प्रशासकीय जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे. जिल्हा नियोजन समितीचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांची ओळख आहे.