Mulshi Panchayat Samiti Election – मुळशी तालुक्यात पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपने नवा कारनामा केला आहे. एकाच जागी दोन उमेदवारांना एबी फाॅर्म दिले. ज्यांचा अधिकृत ठरला त्यांना माघार घेण्यासाठी विनवण्या केल्या. परंतु त्यांनी माघार न घेतल्याने अधिकृत उमेदवाराच्या विरोधात पुरस्कृत उमेदवार दिला आहे.मुळशी तालुक्यातील माण पंचायत समिती गणात मोठा ट्विस्ट आला. भाजपाने युगधंरा नवनाथ पारखी यांना अधिकृत उमेदवारी दिली असताना भाजपाचे जिल्हाध्यक्ष शेखर वढणे यांनी दुसरा एबी फॉर्म दिलेल्या रुपाली नवनाथ बोडके यांना भाजपा पुरस्कृत उमेदवार म्हणून जाहीर केले. त्यामुळे माण गणात भाजप उमेदवारीवरुन चांगलाच घोळ दिसून येत आहे. मतदार राजा नेमका कुणाच्या पारड्यात मतदान टाकणार याकडे पंचक्रोशीतील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे. या गणात भाजपाने माण ग्रामपंचायतच्या सदस्या रुपाली नवनाथ बोडके व युगांधरा नवनाथ पारखी ह्या दोघींनाही पक्षाचे एबी फॉर्म दिले. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल उदमल व मुळशीचे तहसीलदार विजयकुमार चोबे यांनी रुपाली बोडके यांचा एबी फॉर्म अवैध ठरवला. त्यानंतर मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या व अखेर जिल्हाध्यक्ष शेखर वढणे यांना माण गावात येऊन बोडके हेच भाजप पुरस्कृत उमेदवार असल्याचे जाहीर करावे लागले. यावेळी भाजपच्या प्रभारी प्रा. भारती विनोदे, माजी सभापती पांडुरंग ओझरकर, तालुकाध्यक्ष हनुमंत चव्हाण, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष संदीप साठे, माजी उपाध्यक्ष तानाजी हुलावळे, संतोष मोहिते, सुनील भरणे, पांडुरंग राक्षे, दादाराम मांडेकर, हिंजवडीचे सरपंच गणेश जांभुळकर, माणचे उपसरपंच शशिकांत धुमाळ, जीवन साखरे,उपाध्यक्ष रवी बोडके, कृष्णा बुचडे, साहेबराव जाधव, युवराज पायगुडे यांच्यासह माण व पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी हिंजवडी माण गटातील भाजपचे इतर अधिकृत उमेदवार व माण गणातून पुरस्कृत केलेल्या उमेदवार रुपाली बोडके यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. याबाबत भाजपच्या अधिकृत उमेदवार युगांधरा पारखी व त्यांचे पती भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश सचिव नवनाथ पारखी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, पक्षाने आम्हाला उमेदवारी देऊन जो विश्वास दाखवला आहे. त्यास पात्र ठरून सर्वसामान्य लोकांच्या आग्रहास्तव आम्ही कमळ चिन्हावर निवडणुकीला सामोरे जाणार आहे. काही उपद्रवी लोकांनी माझ्याबद्दल षडयंत्र रचले असले तरी मतदारांच्या जोरावर ही निवडणूक जिंकणारच आहे.