प्रभात वृत्तसेवा कामशेत – मावळ तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्या टप्प्यातील वडगाव नगरपंचायत, तळेगाव दाभाडे नगरपरिषद आणि लोणावळा नगरपरिषद या तीनही निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. स्थानिक निवडणुका म्हणजे कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाला संधी देणाऱ्या, पक्षासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांना पुढे आणणाऱ्या निवडणुका म्हणून ओळखल्या जातात. परंतु यंदाच्या निवडणुकीत चित्र अगदी उलट दिसत आहे. विविध पक्षांच्या उमेदवारी याद्यांचा अभ्यास केल्यास सक्षम उमेदवार या नावाखाली घराणेशाही आणि नातेसंबंधांना अधिक प्राधान्य दिल्याचे स्पष्ट जाणवते. काही ठिकाणी अपवादात्मक एखाद्या-दुसऱ्या सामान्य कार्यकर्त्यास उमेदवारी देण्यात आली असली, तरी मोठ्या प्रमाणात नेत्यांच्या नात्यातील, जवळच्या किंवा आर्थिकदृष्ट्या सक्षम उमेदवारालाच जागा मिळाल्या आहेत. हजारो मतदारसंख्या असलेल्या प्रभागांमध्येही काही ठिकाणी तेच ते चेहरे किंवा माजी पदाधिकाऱ्यांच्या घरातील मंडळी पुन्हा रिंगणात दिसत आहेत. परिणामी कार्यकर्त्यांना न्याय देणे हे नेत्यांच्या भाषणापुरतेच मर्यादित राहिल्याचे मत नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. समजुतीच्या आड सेटलमेंट वडगाव वगळता तळेगाव आणि लोणावळ्यात मोठ्या प्रमाणात जागा बिनविरोध आल्या. शेवटच्या क्षणी घोषित झालेल्या रिंगणात अनेक उमेदवार होते, मात्र त्यांनी पुन्हा माघार घेतली. काही ठिकाणी पक्षांतर्गत समन्वय झाला, तर काही ठिकाणी समजुतीच्या नावाखाली सेटलमेंट झाल्याच्या चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहेत. मात्र या चर्चांना नेते आणि पक्षाचे पदाधिकारी गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. सामान्य कार्यकर्त्यांनी सावध व्हायला हवे सध्याच्या राजकीय गणितांमधील बदल पाहता, सामान्य कार्यकर्त्यांनी आता अधिक सावध होण्याची वेळ आली आहे. नुसते नेत्यामागे पळत राहण्यापेक्षा स्वतःचा जनाधार तयार करणे, लोकांमध्ये काम करून ओळख निर्माण करणे आवश्यक बनले आहे. लोकशाहीत जनता हीच खरी राजा असते. एकावेळी पैसा व प्रभाव यापेक्षा लोकांशी नाळ जुळवणारा नेता अधिक मान्यता मिळवतो. त्यामुळे राजकारणात सक्रीय राहू इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांनी स्वतःचे अस्तित्व स्वतः निर्माण करण्याची हीच योग्य वेळ आहे.