प्रभात वृत्तसेवा कामशेत – जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वत्र जोरदार प्रचारमोहीम सुरू आहेत. या प्रचारातून अनेक महिलांना थेट रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे. निवडणूक प्रचार ही केवळ राजकीय प्रक्रिया न राहता, महिलांसाठी उत्पन्नाचे आणि अनुभवाचे साधन ठरत असल्याचे वास्तव समोर येत आहे. निवडणुकींच्या पार्श्वभुमीवर विविध राजकीय पक्ष, उमेदवार आणि सामाजिक आघाड्यांना प्रचारासाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची आवश्यकता भासत असते. त्यामुळे शहरातील स्थानिक महिला मोठ्या संख्येने प्रचाराच्या कामात सहभागी होत आहेत. पत्रक वाटप, घरोघरी जाऊन उमेदवारांविषयी माहिती देणे, मतदारांशी संवाद साधणे, सभा-मेळाव्यांची आखणी तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती पोहोचवणे अशी विविध कामे महिलांकडून केली जात आहेत. अनेक महिलांसाठी ही प्रचारकामे घरगुती जबाबदाऱ्यांबरोबर करता येण्यासारखी असल्याने त्यांना मोठा फायदा होत आहे. काही तासांचे काम, निश्चित मानधन आणि आपल्या गावातच काम करण्याची संधी मिळत असल्याने महिलांचा सहभाग दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. यामुळे महिलांना नियमित स्वरूपाचे उत्पन्न मिळू लागले असून, त्याचा सकारात्मक परिणाम कुटुंबाच्या आर्थिक स्थितीवर होत आहे. अनेक महिलांनी सांगितले की, शेतीपूरक कामे किंवा घरकामाव्यतिरिक्त अतिरिक्त उत्पन्नाचा हा चांगला स्रोत ठरत आहे. मिळालेल्या पैशातून मुलांच्या शिक्षणाचा खर्च, घरगुती गरजा किंवा बचत करता येत असल्याने महिला समाधान व्यक्त करत आहेत.प्रचार मोहिमेत सहभागी होताना महिलांचा समाजाशी थेट संपर्क येत आहे. विविध लोकांशी संवाद साधणे, आपली भूमिका स्पष्टपणे मांडणे आणि सार्वजनिक ठिकाणी वावर वाढणे यामुळे महिलांचा आत्मविश्वास वाढत असल्याचे दिसून येत आहे. अनेक महिला पहिल्यांदाच अशा स्वरूपाच्या कामात सहभागी झाल्या असून अधिक आत्मविश्वासाने काम करत आहेत. विशेष म्हणजे, काही महिलांना या प्रचारकामाच्या माध्यमातून पुढील काळात सामाजिक कामे, बचत गट, स्वयंरोजगार किंवा स्थानिक पातळीवरील संघटनांमध्ये सक्रिय होण्याची प्रेरणा मिळत आहे. त्यामुळे प्रचार मोहिमा या महिलांसाठी केवळ तात्पुरता रोजगार न राहता, पुढील वाटचालीसाठी एक पायरी ठरत असल्याचे स्पष्ट होत आहे.