प्रभात वृत्तसेवा कान्हे – पुणे- मुंबई महामार्गालगत साईड पट्ट्यावर काही व्यापाऱ्यांनी अनधिकृतपणे उभारलेले जाहिरात आणि व्यवसायिक फ्लेक्स वाहनचालकांसाठी अपघाताचा धोका ठरत आहेत. महामार्गावर वेगात धावणाऱ्या वाहनांचे लक्ष या फलकांमुळे विचलित होत असून, अपघातांची शक्यता वाढली आहे. महामार्गाच्या अगदी कडेला, साईड पट्ट्यावर नियम डावलून हे बोर्ड उभारण्यात आले असून कान्हे, वडगाव, तळेगाव, कामशेत, कार्ला, लोणावळा परिसरात वाहतूक सुरक्षेच्या नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे चित्र आहे.स्थानिक नागरिक व महामार्गावरून नियमित प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी या प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अनेक वेळा संबंधित विभागांकडे तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने प्रशासनाच्या उदासीनतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. प्रशासनाने वेळेत उपाययोजना न केल्यास भविष्यात गंभीर अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.महामार्गावरील सुरक्षित वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी प्रशासनाने तातडीने पाहणी करून साईड पट्ट्यावर लावलेले सर्व अनधिकृत बोर्ड हटवावेत, अशी जोरदार मागणी वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.