प्रभात वृत्तसेवा वडगाव मावळ – मावळ तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगरपंचायत आणि नगरपरिषदांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी एकतर्फी विजय मिळवल्यानंतर आता सर्व लक्ष त्यांनी मावळ पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीकडे केंद्रित केलेले असून या निवडणुका सहजपणे एकतर्फी व प्रचंड बहुमताने जिंकण्याचा चंग बांधला आहे. मावळ तालुक्यातील लोणावळा, तळेगाव दाभाडे नगर परिषद व वडगाव नगरपंचायती मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रथमच स्पष्ट बहुमत मिळवून नगराध्यक्षपदही मिळवले तर तळेगाव दाभाडे नगर परिषदेत महायुती म्हणून निवडणूक लढवून सर्वाधिक जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मिळवल्या. या निवडणुकांच्या निकालाने मावळ विधानसभा मतदारसंघातील सर्वात मोठ्या शहरांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एकतर्फी कब्जा मिळविला आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकानंतर तालुक्यातील पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुका होणार आहेत या निवडणुका स्वबळावरच लढवाव्यात असा कार्यकर्त्यांचा आग्रह असून जिल्हा परिषदेच्या पाच जागा आणि पंचायत समितीच्या दहा जागा जिंकण्याचे मनसुबे आमदार सुनील शेळके यांनी निश्चित केलेले आहे.यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार सुनील शेळके यांनी ग्रामीण भागावर चांगले वर्चस्व मिळवले होते. ग्रामीण भागातील वाढता कल आणि केलेली विकास कामे यामुळे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आमदार शेळके यांच्या रूपाने तयार झालेला आहे. या निवडणुकांसाठी लागणारे उमेदवार आणि ते करत असलेले काम यावरून तरी या तालुक्यात राष्ट्रवादीच वरचढ होईल असा बोलबाला सध्या सर्वजण व्यक्त करत आहेत. त्यामुळे मावळ तालुक्यातील या निवडणुका महायुती विरुद्ध महाआघाडी अशा न होता त्या स्वबळावरच राष्ट्रवादी काँग्रेसने लढवाव्यात अशी आग्रही भूमिका तालुका पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच इच्छुक उमेदवार हे आमदार शेळके यांच्याकडे मांडत आहेत. मावळ पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीतील आरक्षणे जाहीर झाल्यानंतर त्या त्या मतदारसंघातील इच्छुकांनी आपल्याला उमेदवारी मिळावी व ती मिळेल या आशेने मतदार जलसंपर्क मोहिमा सुरू ठेवलेल्या आहेत. काही इच्छुक उमेदवार पक्षाला बरोबर घेऊन कार्यक्रम करत आहेत तर काहीजण स्वतंत्रपणे मतदार जनसंपर्क कार्यक्रम घेत आहेत. आमदार शेळके यांचा तालुक्यातील विकास कामामुळे व संघटनात्मक बांधणीमुळे प्रत्येक मतदार संघ हा प्रभावीपणे पक्षालाच मिळू शकतो असा विश्वास इच्छुकांमध्ये निर्माण झाल्याने अनेक जण प्रत्येक मतदारसंघात इच्छुक झालेले आहेत असे असले तरी या सर्वांवर प्रभाव हा आमदार शेळके यांचाच राहणार आहे व या निवडणुका आमदार आमदार सुनील शेळके शिवाय जिंकता येणार नाही त्यामुळे प्रत्येकजण आमदार शेळके यांच्या शब्दावर विसंबून राहिलेला आहे. इच्छुकांचा आर्थिक बोजा वाढला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असे जाहीर झाल्यानंतर त्या विविध कारणामुळे पुढे ढकलण्यात आल्या त्यामुळे इच्छुकांच्यावर मोठा आर्थिक बोजा वाढला. त्यामुळे निवडणुकांसाठीच्या खर्चासाठी आर्थिक तरतुदी करिता निधी कसा उभा करायचा याबाबत इच्छुक उमेदवारांना वेगवेगळे मार्ग शोधावे लागत आहेत. यासाठीही काहीजणांना आमदार शेळके यांच्या आधाराची गरज असल्याचे बोलले जात आहे.