प्रभात वृत्तसेवा वडगाव मावळ – मावळ तालुक्यातील टाकवे बुद्रुक येथील इंद्रायणी सहकारी औद्योगिक वसाहतीचे नामकरण करण्यात आले असून, वसाहतीचे पूर्वीचे इंद्रायणी औद्योगिक सहकारी वसाहत हे नाव बदलून आता कृष्णरावजी भेगडे इंद्रायणी औद्योगिक सहकारी वसाहत मर्यादित असे अधिकृत नामकरण करण्यात आले आहे. मावळ तालुक्याचे माजी आमदार स्व. कृष्णरावजी भेगडे यांनी सहकाराच्या माध्यमातून स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी उभारलेल्या या औद्योगिक वसाहतीस त्यांच्या कार्याला समर्पित म्हणून हे नाव देण्यात आल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार शेलार यांनी पत्रकार परिषदेत दिली.याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष सचिन उर्फ बाळासाहेब ढोरे, संचालक गणेश खांडगे, राजश्री म्हस्के, राजेश गाडे पाटील, अरुण वाघमारे, व्यवस्थापक बाळासाहेब गाडे पाटील, विनायक कदम, हर्षवर्धन शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. अध्यक्ष नंदकुमार शेलार म्हणाले की, मावळभूषण कृष्णरावजी भेगडे यांनी टाकवे बुद्रुक येथे औद्योगिक वसाहत उभारण्यासाठी मोलाचे योगदान दिले. आज टाकवे पट्टा उद्योग-व्यवसायाचे नवे केंद्र म्हणून विकसित होत असून, त्यांच्या कार्याची दखल घेत सर्वानुमते वसाहतीस भेगडे यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला. दि. २६ डिसेंबर २०२५ रोजी इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या मावळभूषण कृष्णराव भेगडे जाहीर व्याख्यानमाला (वर्ष ११) च्या दुसऱ्या दिवशी औद्योगिक वसाहतीच्या नामफलकाचे प्रातिनिधिक अनावरण करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ उद्योगपती व कायनेटिक ग्रुपचे अध्यक्ष पद्मश्री अरुण फिरोदिया, मालपाणी उद्योगसमूहाचे संजय मालपाणी तसेच संतसाहित्य अभ्यासक डॉ. सदानंद मोरे प्रमुख उपस्थित होते. औद्योगिक वसाहतीमुळे रोजगारनिर्मितीला चालना ही औद्योगिक वसाहत लघु व मध्यम उद्योगांसाठी आधारस्तंभ ठरत आहे. उद्योजकांना जागा, पाणीपुरवठा, वीज तसेच आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य संस्था करीत आहे. नामकरणानंतर औद्योगिक वसाहतीच्या मुख्य प्रवेशद्वारावर उभारण्यात येणाऱ्या कमानीचे भूमिपूजन लवकरच करण्यात येणार असून, संस्थेच्या आवारात स्व. कृष्णरावजी भेगडे यांचे स्मारक उभारण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती शेलार यांनी दिली. संस्थेचे अध्यक्षपद नंदकुमार शेलार, उपाध्यक्ष सचिन उर्फ बाळासाहेब ढोरे, तसेच कार्यकारिणी सदस्य गणेश खांडगे, राजश्री म्हस्के, मंगला सरवदे, अरुण वाघमारे, मनोज ढमाले, प्रशांत भागवत, सुरेश आडकर, गणेश पवार आदी सहकारी कार्यरत आहेत. आभार प्रा. सत्यजित खांडगे यांनी मानले.