प्रभात वृत्तसेवा वडगाव मावळ – मावळ तालुक्यात विकासाच्या नावाखाली सुरू असलेला कथित भ्रष्टाचार थांबवायचा असेल, तर आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भाजपा–शिवसेना युतीला मत द्या, असे आवाहन भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे यांनी केले. याचवेळी त्यांनी आमदार सुनील शेळके यांच्यावर जोरदार टीका केली. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी अधिकृत उमेदवारांचे अर्ज भरण्यापूर्वी भाजप–शिवसेना युतीच्या वतीने तहसील कार्यालयासमोर शक्तिप्रदर्शन आणि सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत बोलताना गणेश भेगडे यांनी “विकासासाठी भरपूर निधी आणल्याचे सांगितले जाते, मग निवडणुकीत मतांसाठी पैसे का वाटले जातात?” असा थेट सवाल उपस्थित केला. भेगडे म्हणाले की, तालुक्यातील जलजीवन पाणीपुरवठा योजना, रस्ते विकास आणि इतर कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहे. हा भ्रष्टाचार रोखण्यासाठीच भाजप–शिवसेना युती निवडणुकीच्या मैदानात उतरली असून, युतीचा विजय निश्चित असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या सभेला माजी राज्यमंत्री संजय भेगडे, निवडणूक प्रचारप्रमुख बाळासाहेब नेवाळे, कोअर कमिटी अध्यक्ष निवृत्ती शेटे, माजी जिल्हा परिषद सभापती बाबूराव वायकर, माजी उपसभापती शांताराम कदम, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेश खांडभोर, सुभाषराव जाधव, प्रशांत भागवत यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. पत्रकार परिषदेतही आमदारांवर टीका यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत निवडणूक प्रचारप्रमुख बाळासाहेब नेवाळे यांनीही आमदार सुनील शेळके यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र टीका केली. “पगारी कार्यकर्ते आणि निवडणूक प्रक्रियेत महिलांना पुढे करून पक्षातील मूळ कार्यकर्त्यांचे अस्तित्व संपवण्यात आले आहे,” असा आरोप त्यांनी केला.“इतका मोठा जनाधार असल्याचा दावा केला जातो, तर मग पोलीस संरक्षणाची गरज का?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला. दरम्यान, निवृत्ती शेटे यांनी आमदार शेळके यांच्याकडून करण्यात आलेले आरोप फेटाळून लावले.