Maval Election – मावळात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उद्या (दि. ९ फेब्रुवारी २०२६) मतमोजणी होणार असून, मावळ प्रशासन यासाठी पूर्णपणे सज्ज झाले आहे. वडगाव येथील नवीन प्रशासकीय इमारत (तहसील कार्यालय, मावळ) येथे सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात होईल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र नवले यांनी दिली. मतमोजणी सुरळीत पार पाडण्यासाठी एकूण २५ प्रशिक्षित पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये ५ पथके टपाली मतपत्रिकांच्या मोजणीसाठी, तर २० पथके ईव्हीएम मोजणीसाठी कार्यरत असतील. संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया एकूण १७ फेऱ्यांमध्ये पूर्ण होणार आहे. प्रत्येक फेरीचे निकाल ध्वनीक्षेपकाद्वारे वेळोवेळी जाहीर केले जातील. सुरक्षा व्यवस्था आणि प्रवेश मतमोजणी केंद्राच्या परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला आहे. केंद्रात प्रवेशासाठी केवळ अधिकृत पास असलेल्या व्यक्तींनाच प्रवेश दिला जाणार आहे. उमेदवारांचे प्रतिनिधी आणि अधिकारी यांच्यासाठी स्वतंत्र बसण्याची सोय करण्यात आली आहे. दोन तासांत निकालाचे चित्र स्पष्ट होईल. मात्र अधिकृत निकाल घोषित करण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. मावळ तालुक्याचे राजकीय भवितव्य आज दुपारपर्यंत स्पष्ट होणार असल्याने संपूर्ण तालुक्याचे लक्ष या निकालांकडे लागले आहे.