Maval Election 2026 – राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका शनिवारी (दि. ७) पार पडणार आहेत. तालुक्यातील जिल्हा परिषदेचे पाच गट आणि पंचायत समितीचे दहा गण अशा एकूण १५ जागांसाठी ही निवडणूक प्रक्रिया राबवली जाणार असून, यासाठी तालुक्यात २४३ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे, अशी माहिती मावळ-मुळशी प्रांताधिकारी सुरेंद्र नवले यांनी दिली.राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांची अधिकृत घोषणा केली होती.त्यानुसार मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांची निवडणूक प्रक्रिया जानेवारी महिन्याच्या मध्यापासून सुरू झाली आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार शुक्रवार, दि. १६ जानेवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक अधिसूचना प्रसिद्ध केली होती. त्यानंतर १६ ते २१ जानेवारी या कालावधीत उमेदवारांकडून नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यात आले. दाखल झालेल्या अर्जांची छाननी गुरुवारी (दि. २२ जानेवारी) पार पडली. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत मंगळवारी (दि. २७ जानेवारी) संपली असून, त्याच दिवशी अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यानंतर उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले. जिल्हा परिषद पुणे दरम्यान, बुधवारी (दि. २८ जानेवारी) राज्याचे उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्यामुळे राज्यात तीन दिवसांचा शासकीय दुखवटा पाळण्यात आला. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने मतदानाची तारीख बदलत दि. ५ फेब्रुवारी ऐवजी दि. ७ फेब्रुवारी रोजी मतदान होईल, तर सोमवारी (दि. ९ फेब्रुवारी) मतमोजणी होईल, असे जाहीर केले. प्रशासनाकडून तयारी पुर्ण शनिवारी (दि. ७) सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यानंतर सोमवारी (दि. ९) मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येणार आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत, पारदर्शक आणि कायदेशीर पद्धतीने पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून सर्व आवश्यक तयारी सुरू असल्याचे प्रांताधिकारी सुरेंद्र नवले यांनी सांगितले. २ लाखांहून अधिक मतदार मतदानासाठी सज्ज मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणनिहाय मतदारसंख्या प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली आहे. तालुक्यात एकूण २,००,३१६ मतदार असून, यामध्ये १,०२,०८२ पुरुष, ९८,२२६ महिला आणि आठ तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. एवढ्या मोठ्या संख्येने मतदार मतदानासाठी सज्ज असल्याने निवडणूक चुरशीची ठरण्याची शक्यता आहे.