प्रभात वृत्तसेवा पिंपरी – निवडणूक काळात गैरहजर राहिल्याने पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलातील पाच पोलिसांचे निलंबन करण्यात आले. याबाबतचे आदेश पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिले आहेत. पोलीस हवालदार संजय केळकर, सागर बाविस्कर, पोलीस शिपाई जगन्नाथ शिंदे, प्रतिभा गावडे, संतोष जाधव अशी निलंबित केलेल्या पोलिसांची नावे आहेत. हे सर्वजण पोलीस मुख्यालयात नेमणुकीस आहेत.पिंपरी-चिंचवड मनपा निवडणुकीसाठी गुरुवारी (१५ जानेवारी) मतदान झाले. त्यापूर्वी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील तळेगाव, आळंदी, चाकण नगरपरिषदांची निवडणूक झाली. आता पिंपरी-चिंचवड मनपाची निवडणूक सुरु असून या कालावधीत शहरात अनेक महत्वाचे नेते शहराचा दौरा करत आहेत. अशा कालावधीत मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावला जातो. मनुष्यबळाअभावी आहे त्या मनुष्यबळावर पोलिसांना संपूर्ण कामकाज करावे लागते.निलंबित केलेले पोलीस अंमलदार मागील काही महिन्यांपासून रजेवर गेले आहेत. त्यांना पोलीस मुख्यालयाकडून अनेक वेळेला पत्र पाठवून कर्तव्यावर हजर होण्यास सांगण्यात आले होते. मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे कारवाईचा बडगा उगारत पोलीस आयुक्तांनी पाच जणांचे तडकाफडकी निलंबन केले आहे. कर्तव्यावर हजर न राहण्याबाबत त्यांची विभागीय चौकशी सुरु राहणार असल्याचे आदेशात नमूद आहे.