प्रभात वृत्तसेवा खालापूर – खोपोली नगरपालिकेच्या निवडणुकीचे मतदान २ डिसेंबर रोजी शांततेत पार पडले. मतदानानंतर दुसऱ्याच दिवशी, म्हणजे ३ डिसेंबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होईल, अशी निवडणूक आयोगाची अधिकृत घोषणा केली होती. पण मतदान प्रक्रियेदरम्यानच अचानक न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे खोपोलीसह अनेक नगरपालिकांचे निकाल थेट २१ डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आले. या अनपेक्षित निर्णयामुळे उमेदवार, कार्यकर्ते आणि मतदार हेलावून गेले असून संपूर्ण खोपोली शहरात राजकीय अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. उमेदवार आता कोणत्या बूथवर किती मतदान झाले? हे मतदान आपले की विरोधकाचे? आपले प्राबल्य असलेल्या भागात झालेले मतदान आपल्या पथ्यावर पडेल का? या विश्लेषणात गुंतले असून जसे-जसे विश्लेषण सखोल होत आहे तसे-तसे उमेदवारांची धाकधूक वाढत आहे. ३ डिसेंबरच्या निकालासाठी उमेदवारांनी आपापल्या पक्ष कार्यालयात तयारी केली होती. काहींनी मोजणी केंद्राजवळ कार्यकर्त्यांसाठी जागा निश्चित केली होती, तर काहींनी संभाव्य विजयासाठी कार्यक्रमांची पूर्वतयारीही केली होती. पण अचानक आलेल्या निकाल विलंबामुळे या सर्व नियोजनावर पाणी फिरले आहे. उमेदवारांकडून स्पष्ट नाराजी व्यक्त होत असून, २० दिवस वाट पाहावी लागणार असल्याने अनेकांना तणाव जाणवत आहे. या निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट), भाजप आणि आरपीआय पक्षाने महायुती केली होती. तर राष्ट्रवादी (अजित पवार), शिवसेना (ठाकरे गट) आणि शेकाप यांनी परिवर्तन विकास आघाडी केली आणि निवडणुकीला सामोरे गेले. मात्र तिकीट कापल्याने शिंदे गटात नाराजी वाढली असताना राष्ट्रवादी (अजित पवार), शिवसेना (ठाकरे गट) आणि शेकाप यांच्या जागा वाटपाचा तिढा देखील सुटला नव्हता. त्यामुळे अनेक ठिकाणी शिवसेना (ठाकरे गट) आणि शेकाप यांनी जास्त उमेदवार उभे केल्याने मैत्रीपूर्ण लढती झाल्या. या निवडणुकीसाठी शिवसेनेच्या (शिंदे गट) नगराध्यक्षपदाचे उमेदवार कुलदिपक शेंडे यांच्यासह २२ नगरसेवक उमेदवार, आठ भाजपसाठी तर आरपीआय पक्षाला एक जागा सोडली असून शिंदे गटाच्या चिन्हावर उमेदवारी अर्ज भरला आहे. राष्ट्रवादीने (अजित पवार) थेट नगराध्यक्षपदासाठी डॉ.सुनिल पाटील आणि २४ नगरसेवक उमेदवार, शेकापच्या १० आणि ठाकरे गटाच्या आठ उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. त्यामुळे उमेदवारी अर्ज जास्त भरल्यामुळे त्यांच्यामधील जागा वाटपचा तिढा सुटला नव्हता. परिणामी निवडणूक काळात अनेक अडचणींचा सामना परिवर्तन विकास आघाडीला करावा लागला. मात्र असे असतानाही दोन्ही आघाड्या या अडचणींवर मात करून निवडणुकीला सामोरे गेले. मात्र या निवडणुकीचा ३ डिसेंबरला लागणारा निकाल २१ डिसेंबरला जाहीर होणार असल्याने उमेदवारांची काळजी अधिक वाढली आहे. अनेकांनी विजयाची तयारीही केली होती, त्यामुळे या निर्णयाबद्दल अनेकांनी नाराजीही व्यक्त केली.