खालापूर – खोपोली नगरपरिषद निवडणुकीत महायुतीतील शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) हे दोन्ही गट समोरासमोर उभे ठाकले होते. एका बाजूला आमदार महेंद्र थोरवे तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांची प्रतिष्ठा पणाला लागल्याने स्पर्धा चुरशीची ठरली. मतदान दिवशी काही इव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या, काही प्रभागांमध्ये वातावरण खेळीमेळीचे राहिले, तर काही ठिकाणी विरोधी गटांचे कार्यकर्ते समोरासमोर धावून जात असल्याने तणाव निर्माण झाला. मात्र पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात ठेवली. परंतू मतमोजणी पुढे ढकलल्यानंतर याठिकाणी देखील उमेदवार आणि कार्यकर्त्यांचा ताण वाढला आहे. खोपोलीत दोन पाळ्यांत पोलिसांचा बंदोबस्त स्थानिक पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली खोपोलीतील स्ट्रॉंग रूमवर दोन पाळ्यांत सुरक्षा व्यवस्था उभारण्यात आली आहे. सुरक्षा यंत्रणेत एक पोलीस अधिकारी, १५ पोलीस कर्मचारी, रॅपिड अॅक्शनचे ३० जवान, एसआरपीचे १२ कर्मचारी सहभगी आहेत. सोबतच कोणताही धोका टाळण्यासाठी अग्निशमन दलाची गाडीही स्ट्रॉंगरूम परिसरात २४ तास तैनात ठेवण्यात आली आहे. निकालाची उत्सुकता शिगेला सध्या वडगाव मावळ आणि खोपोलीसह अनेक ठिकाणी निकालाची प्रचंड उत्सुकता आहे. गेल्या काही आठवड्यांपासून तापलेल्या प्रचार मोहीमेचा अंतिम सामना २१ डिसेंबरच्या मतमोजणीत होणार आहे. दरम्यान, प्रशासन आणि पोलिसांनी उभारलेली कडक सुरक्षा व्यवस्था पाहता मतदान यंत्रांची सुरक्षितता, पारदर्शकता आणि निष्पक्षता अबाधित राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.