प्रभात वृत्तसेवा खालापूर – खालापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांवर असलेले खड्यांचे ग्रहण नेमके कधी सुटणार, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. तालुक्यातील अनेक जोडरस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, खडीमुळे वाहन घसरण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. या पार्श्वभूमीवर वावोशी फाटा ते वावोशी गाव हा रस्ता सध्या अपघातांना आमंत्रण देणारा ठरत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून, रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. या मार्गावरून वाहनचालक, प्रवासी, पादचारी, शाळकरी विद्यार्थी तसेच महिला वर्ग मोठ्या प्रमाणावर ये-जा करत असतात. मात्र खड्ड्यांमुळे हा प्रवास अत्यंत कष्टदायक बनला असून, नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. सध्या रस्ता आणि रस्त्यातील खड्डे ओळखणेही कठीण झाले आहे. त्यामुळे दुचाकी व चारचाकी वाहनांचे अपघात वाढले असून, अनेकांना आर्थिक नुकसान व शारीरिक दुखापतींना सामोरे जावे लागत आहे. पायी चालताना पाय मुरगळणे, वाहन घसरणे, तसेच खड्ड्यातील मोठमोठ्या दगडांमुळे वाहनांचे नुकसान होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. या रस्त्यावरून दररोज शेकडो शाळकरी विद्यार्थी व ग्रामस्थ प्रवास करत असल्याने सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. खड्ड्यांतून मार्ग काढताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत असून, नागरिकांचा संताप दिवसेंदिवस वाढत आहे. परिसरातील नागरिकांनी व लोकप्रतिनिधींनी संबंधित प्रशासनाने या रस्त्याच्या दुरवस्थेचे गांभीर्य ओळखून तातडीने विशेष निधी उपलब्ध करून वावोशी फाटा ते वावोशी गाव रस्ता खड्डेमुक्त करावा, अशी जोरदार मागणी केली आहे. मात्र प्रशासन याकडे गांभीर्याने पाहणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. “वावोशी फाटा ते वावोशी गाव रस्ता गेल्या काही वर्षापासून खड्ड्यांच्या विळख्यात सापडल्याने येथून प्रवास करणे सर्वांना कठीण बनले आहे, त्यामुळे वाहनचालक आणि नागरिक संताप व्यक्त करत असताना, संबंधित विभागाचे मात्र याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. परंतु प्रशासनाने याचे गांभीर्य घेत हा रस्ता लवकरात लवकर खड्डे मुक्त करत नागरिकांची गैरसोय दूर करावी.” – महेश कडू, माजी उपसरपंच, वावोशी