प्रभात वृत्तसेवा खालापूर – खालापूर तालुक्यातील नावंढे ग्रामपंचायत हद्दीत एका बड्या औद्योगिक समुहाच्या गृहनिर्माण क्षेत्रातील कंपनीने 101 एकर जमीन खरेदी केली आहे. या ठिकाणी गृहप्रकल्प उभारण्यात येत आहे. कंपनीने केलेल्या खोदकामामुळे वीज पुरवठा खंडित झाला आणि यामुळे दोन दिवसांपासून ग्रामपंचायतीतील गावांचा पाणीपुरवठा खंडित झाला आहे. यामुळे संतप्त ग्रामस्थांनी जिथे वीजवाहिनी खंडित झाली त्या ठिकाणी जात कंपनी व्यवस्थापन व महावितरण प्रशासनाला धारेवर धरले. या बड्या कंपनीने स्थानिकांना रोजगाराची संधी न दिल्याने अनेक दिवसांपासून ग्रामस्थांमध्ये कंपनीबाबत रोष आहे. त्यातच कंपनीमुळे पाणी पुरवठा ठप्प झाल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. कंपनीच्या आवारात मोठ्या यंत्रांच्या सहाय्याने सपाटीकरण करत जागेची लेव्हलिंग करण्यात येत आहे. कंपनीच्या कामात वीज खांब अडथळा ठरत असल्याने कंपनी प्रशासनाने महावितरण प्रशासनाला हाताशी धरत ग्रामपंचायत प्रशासन व ग्रामस्थांना विश्वासात न घेता जवळपास दीड ते दोन किलोमीटर अंतराचे एचटी लाइनचे पोल्स काढून टाकत भूमिगत वीजवाहिनी टाकली असता कामा दरम्यान ही वाहिनी तुटली. यामुळे दोन दिवसापासून घोडीवली गाव, नावंढे, शिवगाव पाणीपुरवठा खंडित झाला. “आमच्या गावांना वीज पुरवठा करणारे एचटी लाइनचे पोल्स गोदरेज कंपनीच्या हितासाठी महावितरणने ग्रामस्थ व ग्रामपंचायतला विश्वासात न घेता काढून टाकले आणि त्याठिकाणी नव्याने भूमिगत वीजवाहिनी टाकली. मात्र जेसीबीच्या सहाय्याने कंपनीच्या आवारात खोदकाम करत असताना अंडरग्राउंड लाइन तुटल्याने दोन दिवसांपासून ग्रामपंचायत हद्दीतील पाणीपुरवठा करणारी योजना खंडित झाली आहे. कंपनीच्या हितासाठी महावितरण ग्रामस्थांना वेठीस धरत असेल तर तो अन्याय कदापि सहन केला जाणार नाही. तर महावितरण कोणत्या आधारावर खांब काढले याचा खुलासा द्यावा, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल.” – पद्माकर खंडागळे, ग्रामस्थ घोडीवली “कायद्याने जेव्हा एचटी लाइन अंडरग्राउंड टाकली जाते, तेव्हा ती चार फूट खोल व दोन लाइन टाकल्या जातात. जेव्हा एक लाइन खराब झाली तर दुसऱ्या लाइनचा वापर करू शकतो. त्यामुळे विद्युत पुरवठा खंडित होऊ शकत नाही. मात्र या ठिकाणी कंपनीचे पैसे वाचवण्यासाठी व काम झटपट व्हावे यासाठी एक लाइन टाकल्याने याचा नाहक त्रास ग्रामस्थांना सहन करावा लागला आहे. त्यामुळे महावितरण व कंपनी व्यवस्थापनाच्या कारभाराबाबत नाराजी आहे.” – जगन्नाथ हाडप, नावंढे ग्रामस्थ “नावंढे गावचे हद्दीमध्ये गोदरेज कंपनी रेसिडेंशियल प्रोजेक्ट डेव्हलप करत आहे. सदर ठिकाणी महावितरण कंपनीची ओव्हर् हेड एचटी लाइन अडथळा येत असल्यामुळे सदरची लाइन महावितरणच्या नियमानुसार गोदरेज कंपनीने अंडरग्राउंड करण्याचे काम सुरु आहे.” – प्रवीण शेटगे, सहाय्यक अभियंता खालापूर शाखा