प्रभात वृत्तसेवा खालापूर – नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शनाने करण्याच्या भावनेतून अष्टविनायकापैकी महड येथील श्री वरदविनायकाच्या मंदिरात नववर्षाच्या पहिल्याच दिवशी भाविकांनी मोठी गर्दी केली. पहाटेपासूनच दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या असून, गणपती बाप्पा मोरया जयघोषाने संपूर्ण महड गाव दुमदुमून गेले होते. जगभरात सरत्या वर्षाला निरोप देत २०२६ या नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. नव्या वर्षाची सुरुवात श्री गणेशाच्या दर्शनाने व्हावी, ही भावना घेऊन नवी मुंबई, पुणे, कोकणासह राज्याच्या विविध भागांतून हजारो भाविक महड येथे दाखल झाले होते. नववर्षाची पहाट बाप्पाच्या दर्शनाने उजळावी, या श्रद्धेने भाविकांनी दर्शनासाठी संयमाने प्रतीक्षा केली. पहाटेपासून सुरू झालेली भाविकांची गर्दी संध्याकाळपर्यंत कायम होती. मंदिर परिसरात दर्शनासाठी व्यवस्था करण्यात आली असून, संध्याकाळपर्यंत लाखो भाविकांनी श्री वरदविनायकाचे दर्शन घेतल्याची माहिती मंदिर प्रशासनाने दिली. अष्टविनायकांपैकी महडचा वरदविनायक हा सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण करणारा व भक्तांना वरदान देणारा गणपती म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामुळे नववर्षाच्या पहिल्याच दिवशी येथे अभूतपूर्व गर्दी उसळल्याचे चित्र पाहायला मिळाले.