प्रभात वृत्तसेवा पिंपरी – काळेवाडी येथील एका फटाक्याच्या दुकानाला गुरुवारी सायंकाळी मोठी आग लागली. या आगीत कोणतीही जिवित हानी झाली नसली तरी आगीच्या या घटनेमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. फटाक्याच्या दुकानाला दिवाळीमध्ये परवाना दिला होता. सध्या त्याच्याकडे फटाका विक्रीचा परवाना नव्हता . मात्र रुग्णालया खाली, रंगाच्या दुकानाशेजारी, गॅस गोदामच्या जवळ दिवाळीमध्ये तरी परवानगी दिलीच कशी? अग्निशामक विभागाचा ना हरकत परवाना नसताना रुग्णालय सुरू कसे होते, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.फटाके हे स्फोटक पदार्थांमध्ये येतात. त्याची विक्री करताना परवाना असणे आवश्यक आहे. दिवाळीमध्ये पिंपरी चिंचवड शहरात हजारो फटाक्याची दुकाने असतात. परवाना मात्र १०० विक्रेते देखील घेत नाही. पोलिसांचे अर्थपूर्ण पाठबळ असल्याने केवळ दिखाव्यापुरतीच कारवाई होते. काळेवाडी येथील दुकानाला दिवाळीमध्ये सात दिवसांचा ना हरकत परवाना अग्निशामक विभागाने दिला होता. मात्र त्यानंतर दुकानदाराने कोणताही परवाना न घेता पुन्हा त्याच ठिकाणी फटाक्यांची विक्री सुरू केली. सध्या निवडणुका असल्याने प्रचारफेरी, तसेच उमेदवाराच्या स्वागतासाठी फटाक्यांची आतिषबाजी केली जाते. याशिवाय नववर्षाच्या पाश्र्वभूमीवरही मोठ्या प्रमाणात फटाक्यांचा साठा विक्रीसाठी आणला होता. ३० ऑगस्ट २०२३ मध्ये पूर्णानगर भागात एका रंगाच्या दुकानाला आग लागून चार जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. रंगाच्या दुकानातील बहुतांश पदार्थ हे ज्वलनशील असतात. गुरुवारी ज्या फटाक्याच्या दुकानाला आग लागली होती त्या दुकानाच्या बाजूला रंगाचे दुकान आणि गॅस गोदाम होते. असे असतानाही महापालिकेच्या अग्निशामक विभागाने दिवाळीत तरी फटाक्याच्या दुकानाला परवानगी दिलीच कशी, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.दिल्लीमधील बेबी केअर न्यू बॉर्न रुग्णालयात २५ मे २०२४ मध्ये आग लागली या आगीत अनेक बालकांचा मृत्यू झाला. तात्कालीन आयुक्त शेखर सिंह यांनी रुग्णालयांना अग्निशामक विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र असल्याशिवाय परवानगी देऊ नये, असे स्पष्ट आदेश दिले. शहरातील ६२३ रुग्णालयांपैकी अवघ्या ७२ रुग्णालयांनीच ना हरकत दाखला घेतल्याचे दिसून आले. बी फाॅर्मच्या आधारे परवानगी कोणत्याही खासगी मालमत्तेला शासनाकडून नियुक्त केलेल्या खासगी संस्थांकडून सर्वेक्षण करून केले जाते. त्यांनी केलेले सर्वेक्षण योग्य असल्यास अग्निशामक विभागाकडून ना हरकत दाखला दिला जातो. मात्र काळेवाडी येथील रुग्णालयाबाबतही १५ खाटांच्या रुग्णालयालयास केवळ बी फाॅर्मच्या आधारे परवानगी दिली गेली. अग्निशामक विभागचे ना हरकत प्रमाणपत्र घेतले नसल्याचेही उघडकीस आले आहे. “काळेवाडी येथील फटाक्याच्या दुकानाला कोणताही परवाना अग्निशामक विभागाकडून सध्या दिलेला नव्हता. दिवाळीमध्ये या दुकानाला तात्पुरता परवाना दिला होता. मात्र दुकानाच्या वर रुग्णालय, बाजूला रंगाचे दुकान आणि गॅस गोदाम असताना कोणत्या नियमात परवाना दिला होता? याबाबत महापालिका चौकशी करणार आहे. यात दोषी असलेल्या संबंधित अग्निशामक अधिका-यांवर योग्य ती कारवाई केली जाईल.” – व्यंकटेश दुर्वास, अग्निशामक विभाग प्रमुख