प्रभात वृत्तसेवा पिंपरी – पिंपरी-चिंचवडमध्ये त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि स्क्रिप्ट’च्या आधारे एजन्सीच्या सल्ल्याने बिनबुडाचे आरोप केले. त्यांच्या काळात शहरात काय झाले आणि भाजपाच्या सत्ताकाळात काय विकासकामे केली हे आम्ही सांगतो. पण, ‘‘देवा शप्पथ सांगतो; पैलवानाच्या नादाला लागू नका..’’ अशा शब्दांत भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्यांचे नाव न घेता प्रत्युत्तर दिले आहे. निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून आता प्रचाराचा धुराळा उडत आहे. अशात आता राज्याच्या आणि केंद्राच्या सत्तेत मित्र पक्ष बनून बसलेल्या महायुतीतील भाजप आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्येच जुंपली आहे. शुक्रवारी अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत महापालिकेत भ्रष्टाचार झाल्याचे घणाघाती आरोप केले होते. त्यावर शनिवार भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी प्रत्यत्तुर दिले. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणूक- 2026 च्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीने निगडी येथील भक्ती-शक्ती शिल्पाजवळ आयोजित कार्यक्रमात निवडणुकीच्या प्रचाराचा शुभरंभ केला. यावेळी चव्हाण बोलत होते. या प्रसंगी शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, महामंत्री राजेश पांडे, आमदार शंकर जगताप, आमदार अमित गोरखे, आमदार उमा खापरे यांच्यासह शहरातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विविध पक्षांतील पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. यावेळी रवींद्र चव्हाण म्हणाले की, भाजपाचा कार्यकर्ता कायम लोकांच्या सेवेत आहे. सेवेतून संघटन आम्ही पुढे नेत आहोत. केंद्र व राज्य सरकारने सातत्याने लोकहिताचे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे मोदी सरकार, फडणवीस सरकारला लोकप्रियता मिळाली आहे. लोकसभा निवडणुकीत ज्याप्रमाणे खोटा नॅरेटिव्ह केला. तसा आता काही लोक महापालिका निवडणुकीत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. काही लोकांना एजन्सीज् स्क्रिफ्ट लिहून देतात. एजन्सीज भाड्याने घ्यायच्या आणि पैसा जक्कड आहे. त्यामुळे हजार-दोन हजार लोकांना कंपन्यांमध्ये बसवून ट्रोल करायला पैसे द्यायचे. मी किती पॉप्युलर आहे, हे दाखवण्यासाठी काहीपण करायला लोक तयार आहेत, असा घणाघातही चव्हाण यांनी केला. हिंदुत्वाचे नाव घ्यायला घाबरतात भारतीय जनता पार्टीची विचारधारा ‘राष्ट्र प्रथम’ म्हणून काम करीत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकांची दिशाभूल करणाऱ्यांना पिंपरी-चिंचवडकर भुलणार नाहीत. वर्षानुवर्षे त्यांनी केलेला कारभार पिंपरी-चिंचवडकरांनी पाहिला आहे. शहर स्मार्ट करण्यासाठी, मेट्रो सिटी घडवण्यासाठी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर उभे केले पाहिजे. महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात याचा विचार केला नाही आणि आज वर तोंड करुन बोलत आहेत. हिंदुत्वाचं नाव घ्यायला घाबारताहेत. हिंदुत्वाचे नाव घ्यायला अंगत रग लागते. ती भाजपाशिवाय कोणाकडेही नाही, असेही चव्हाण म्हणाले.