प्रभात वृत्तसेवा पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक २० मध्ये गुरुवारी (१५ जानेवारी) सायंकाळी मोठा गोंधळ झाला. प्रभाग क्रमांक २० मधील महिला उमेदवाराच्या घरात विरोधी पक्षाचे कार्यकर्ते घुसले असल्याचा आरोप करत उमेदवार महिलेने कार्यकर्त्यांसह संत तुकाराम नगर पोलीस ठाणे गाठले. याबाबत माहिती अशी कि, प्रभाग क्रमांक २० (संत तुकाराम नगर, वल्लभनगर) मधून क जागेसाठी भाजप कडून सुजाता पालांडे या उमेदवार आहेत. निवडणूक विभागाच्या पथकांना पालांडे यांच्या घरी दारू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथक पालांडे यांच्या घरात गेले. त्यानंतर पालांडे यांनी याबाबत आक्षेप घेतला. निवडणूक पथकासह आपल्या घरात विरोधी पक्षाचे (राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार) कार्यकर्ते सुरेश खत्री, हरप्रीत सिंग, रवी खत्री हे देखील आले. त्यांनी घरातील सामान अस्ताव्यस्त करत दरोडा घालण्याचा प्रयत्न केला. तसेच घरातील सदस्यांना दमदाटी केली. तसेच धार्मिक भावनाही दुखावल्याचा आरोप सुजाता पालांडे यांनी केला. यानंतर विधानपरिषदेच्या आमदार उमा खापरे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते संत तुकाराम नगर येथे दाखल झाले. पथकामध्ये महिला तसेच महिला पोलीस नसताना देखील हे पथक माझ्या घरात कसे आले, असा जाब पालांडे यांनी पोलिसांना विचारला. त्यानंतर हा गोंधळ संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात पोहोचला. तिथे पोलीस आपली तक्रार घेण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप पालांडे यांनी केला. मात्र आपण कायदेशीर बाबी पडताळून गुन्हा दाखल करून घेत असल्याचे पोलिसांनी सांगितले. रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झालेला नव्हता.