पिंपरी : निवडणूक कामकाजासाठी महापालिका प्रशासनाने आठ क्षेत्रीय कार्यालयांच्या माध्यमातून भक्कम यंत्रणा उभी केली आहे. एकूण ८ निवडणूक निर्णय अधिकारी आणि २४ सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. संपूर्ण निवडणूक प्रक्रियेसाठी ८ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये सुमारे १४ हजार अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. याशिवाय, मतदान प्रक्रियेसाठी ८ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयनिहाय प्रत्येक मतदान केंद्रावर १ केंद्राध्यक्ष, ३ मतदार अधिकारी, १ शिपाई (१० टक्के राखीव कर्मचारी) असे एकूण अंदाजे २०३४ मतदान केंद्रांवर सुमारे १० हजार २५० अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी बुधवारी (दि. १७) दिली. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, निवडणूक विभागाचे उपायुक्त सचिन पवार, अण्णा बोदडे, सहायक आयुक्त किरणकुमार मोरे आदी उपस्थित होते. यावेळी आयुक्त हर्डीकर म्हणाले, महापालिका क्षेत्रासाठी आचारसंहिता पथक प्रमुख आणि उमेदवारांचे हिशोब तपासणी पथक प्रमुख यांचीही स्वतंत्रपणे नेमणूक करण्यात आली आहे. आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी महापालिका आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक संनियंत्रण समिती गठीत करण्यात आली असून, यामध्ये पोलीस आयुक्त व महापालिका अतिरिक्त आयुक्त यांचा समावेश आहे. निवडणुकीच्या काळात होणाऱ्या गैरप्रकारांवर आळा घालण्यासाठी देखील आवश्यक बंदोबस्त करण्यात आला आहे. प्रचार फेऱ्या, सभा आणि अवाजवी खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी मुख्यालय व क्षेत्रीय स्तरावर व्हिडिओग्राफी सर्व्हेलियन्स पथके काम करतील. मतदारांवर प्रभाव टाकणे, प्रलोभन दाखवणे तसेच पैसे व मद्याची अवैध वाहतूक किंवा संशयास्पद हालचालींवर नजर ठेवण्यासाठी भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत. तसेच शहराच्या विविध नाक्यांवर शस्त्रास्त्रे व अवैध वस्तूंच्या वाहतुकीला प्रतिबंध करण्यासाठी चेक पोस्ट पथके कार्यरत राहतील. आचारसंहिता भंगाची कोणतीही तक्रार आल्यास त्यावर तातडीने कार्यवाही करण्यासाठी महापालिका व प्रभाग स्तरावर तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. केंद्रनिहाय मतदार यादी २७ डिसेंबरला प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी १५ डिसेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून, प्रभाग क्रमांक १६ हा ७५ हजार १०५ मतदारांसह सर्वाधिक मतदारांचा प्रभाग ठरला आहे, तर प्रभाग क्रमांक २३ मध्ये सर्वात कमी म्हणजे ३३ हजार ३३ मतदार आहेत. मतदारांच्या सोयीसाठी एकूण २ हजार ३४ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली असून, या केंद्रांची अधिकृत यादी २० डिसेंबर रोजी आणि मतदान केंद्रनिहाय मतदार यादी २७ डिसेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, भयमुक्त आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पाडण्यासाठी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, निवडणुकीचा प्रत्येक टप्पा अचूकपणे पार पाडण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ आणि तांत्रिक सुविधांचे चोखपणे नियोजन केले आहे. नागरिकांनी कोणत्याही अमिषाला बळी न पडता निर्भयपणे मतदान करावे, जेणेकरून त्यांच्या विचारांचे, आवडीचे लोकप्रतिनिधी महापालिका सभागृहात येतील. – श्रावण हर्डीकर, आयुक्त तथा निवडणूक अधिकारी