Hospital Cafeteria Services : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय हे गोरगरीबांचे म्हणून ओळखले जाते. या रुग्णालयाच्या आवारातील उपहारगृहात रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना अपेक्षित सुविधा मिळत नसल्याची तक्रार पुढे आली आहे. रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या नागरिकांना परवडणाऱ्या दरात अन्न मिळावे या उद्देशाने उपहारगृह देण्यात आले असताना येथे ‘शिवभोजन थाळी’ बंद झाल्याने रुग्णांना महागड्या दरात जेवण घ्यावे लागत असल्याची नाराजी व्यक्त होत आहे. महापालिकेने रुग्णालयाच्या आवारातील उपहारगृह चालविण्याची जबाबदारी साई सेवा इंटरप्राईजेस या संस्थेला दिली आहे. मात्र उपहारगृह सुरू झाल्यापासून आजपर्यंत रुग्णांसाठी उपलब्ध असलेली ‘शिवभोजन थाळी’ मिळत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे कमी दरात जेवण मिळण्याऐवजी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना अधिक दरात अन्नपदार्थ खरेदी करावे लागत असल्याचे सांगितले जात आहे. पाणी विकत घेण्याचा आग्रह याहूनही धक्कादायक बाब म्हणजे उपहारगृहात जेवणासाठी किंवा अल्पोपहारासाठी येणाऱ्या नागरिकांना पिण्याचे पाणी सहज उपलब्ध करून दिले जात नसल्याची तक्रार आहे. उपहारगृहातील कोणत्याही टेबलावर पिण्याचे पाणी ठेवले जात नसून ग्राहकांनी पाणी मागितल्यास त्यांना विकतची पाण्याची बाटली टेबलावर आणून ठेवली जाते. एखाद्या व्यक्तीने आग्रह केल्यासच त्याला पिण्यासाठी पाणी दिले जाते, असा आरोप नागरिकांनी केला आहे. या संदर्भात उपहारगृहातील काही कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्वी येथे पिण्यासाठी पाणी ठेवले जात होते. मात्र एकदा टेबलावरील पाणी फरशीवर सांडल्याने एक रुग्ण घसरून पडल्याची घटना घडली होती. त्यानंतर अशा घटना टाळण्यासाठी पिण्याचे पाणी ठेवणे बंद करण्यात आल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, रुग्णालयातील अनेक कर्मचारीही या उपहारगृहाविषयी नाराजी व्यक्त करत आहेत. नागरिकांची मागणी उपहारगृहातील सुविधा व दरांबाबत समाधान नसल्याने काही कर्मचाऱ्यांनी येथे चहा किंवा अल्पोपहार घेणे बंद केले असून ते रुग्णालयाबाहेरील दुकानांवर जाणे पसंत करत असल्याचे सांगितले जाते. रुग्णालयात येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असल्याने येथे परवडणाऱ्या दरात अन्न आणि स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध असणे अपेक्षित आहे. त्यामुळे महापालिकेने या उपहारगृहातील व्यवस्थेची चौकशी करून रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. Top 10 News : ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस , सुनेत्रा पवारांविरोधात ३ जण लढणार आणि रोमांचक लढतीत पंजाबचा 3 विकेट्सने विजय, वाचा अशा टॉप १० बातम्या