प्रभात वृत्तसेवा हिंजवडी – तब्बल तीन वर्षानंतर मुळशी तालुक्यात पुन्हा क्रिकेटचे सामने रंगणार आहेत. संपूर्ण जिल्ह्यात लक्षवेधी ठरणाऱ्या” मुळशी सभापती करंडक” चे नववर्षात पुन्हा आयोजन करण्यात आल्याने तालुक्यातील तमाम क्रिकेट शौकिनांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. १० जानेवारी ते १७ जानेवारी कालावधीत आयटीपार्क माण, फेज तीन येथील फोर स्टार क्रिकेट अकॅडमीच्या भव्य मैदानात सभापती करंडक 2026 चा थरार रंगणार आहे. नाव नोंदणी केलेल्या तालुक्यातील क्रिकेट संघांपैकी निवडक ३६ संघांना यंदा सभापती करंडक स्पर्धेत खेळण्याची संधी मिळणार आहे. विशेष म्हणजे सालाबादप्रमाणे यंदाही सर्व संघांना प्रवेश निशुल्क असणार असून, सर्व सामने रात्रीच्या सत्रात खेळवले जाणार आहेत. त्यासाठी, स्थानिक माणदेवी क्रिकेट क्लबकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. आलिशान चारचाकी, अनेक दुचाकींसह लाखोंच्या रोख रकमेच्या बक्षिसांची यंदा लयलूट होणार आहे. सभापती करंडक 2026 ट्रॉफी, खेळाडूंची जर्सी तसेच, टिम लॉट्स पाडणे यांचा अनावरण सोहळा पुढील आठवड्यात होणार असून, अधिक माहितीसाठी माणदेवी क्रिकेट क्लबकडे संपर्क साधण्याचे आवाहन आयोजक प्रसन्न ओझरकर व भाजपा उपाध्यक्ष रवी बोडके यांनी केले आहे. क्रिकेट शौकिनांची उत्सुकता शिगेला… तब्बल तीन वर्षांच्या प्रतीक्षे नंतर मुळशी सभापती करंडक क्रिकेट सामने होणार असल्याने क्रिकेट संघांसह क्रिकेट शौकिनांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे.जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोजित स्पर्धेत आलिशान बक्षिसांची खिरापत वाटप होणार असल्याने संघाची उत्सुकता शिगेला पोचली आहे.