प्रभात वृत्तसेवा हिंजवडी – मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत माण ग्रामपंचायतीच्या वतीने नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत असून, दुर्गम भाग असलेल्या कोळवन (ता. मुळशी) येथे सायकल बँक हा उपक्रम राबविण्यात आला.कोळवन येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षणासाठी दररोज पाच ते सहा किलोमीटर पायपीट करणाऱ्या गरजू विद्यार्थिनींसाठी ग्रामपंचायतीच्या वतीने ५० सायकलींचे वाटप करण्यात आले. आयटी नगरी माणच्या सरपंच अर्चना आढाव यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. गजानन पाटील यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला असून, माण ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, ग्रामस्थांचे योगदान व लोकवर्गणीतून हा उपक्रम यशस्वीरीत्या साकार करण्यात आला आहे. गटविकास अधिकारी सुधीर भागवत यांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक करत ग्रामपंचायतीला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन ग्रामविकास अधिकारी मदन शेलार यांनी केले व आभार मानले.यावेळी मुळशी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुधीर भागवत, उपसरपंच शशिकांत धुमाळ, प्रदीप पारखी, पंडित गवारे, छाया ओझरकर, शुभांगी भोसले, सुवर्णा भोईर, ग्रामविकास अधिकारी मदन शेलार, सचिन आढाव, कारखान्याचे माजी संचालक पोपट दुडे, माजी सरपंच बबन धिडे, मुख्याध्यापिका धनश्री पालकर, निवेदिता पोळ, रामदास साठे, भरत सातपुते, लहु फाले, सिताराम भिडे, संतोष शेलार, साईदास शिंदे, निलेश फाले, भाऊ टेमघरे, भाऊ दुर्गे, किसन दुर्गे यांच्यासह माण ग्रामपंचायतीचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. “या अनोख्या उपक्रमामुळे विद्यार्थिनींच्या शिक्षणाचा प्रवास अधिक सुलभ करण्याचा आमचा संकल्प साकार झाला आहे. कोळवन व परिसरातील गरजू मुलींना शिक्षणासाठी सुरक्षित व सोयीस्कर प्रवासाची सुविधा मिळावी, हा या उपक्रमामागचा मुख्य उद्देश आहे. राज्य सरकारच्या या महत्त्वाकांक्षी अभियानांतर्गत पुढील काळात आणखी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येतील.” – अर्चना आढाव, सरपंच, माण आयटी नगरी