प्रभात वृत्तसेवा दिघी – भारतीय उद्योजकता विकास संस्थान (EDII) व अॅक्सेंचर यांच्या संयुक्त विद्यमाने, पुणे जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या २६ दिवसीय सूक्ष्म कौशल्य उद्यमिता विकास (एमएसडीपी) प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप नुकताच पार पडला. या समारोप कार्यक्रमात 59 महिला उद्योजिकांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. हा उपक्रम अहमदाबादस्थित भारतीय उद्योजकता विकास संस्थानव अॅक्सेंचर यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), पुणे यांच्या सहकार्याने राबविण्यात आला. प्रशिक्षणादरम्यान महिलांना मसाला उत्पादनांचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्यात आले. तसेच उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी विविध प्रदर्शन संदर्भातील माहिती, पॅकेजिंग, ब्रँडिंग व मार्केटिंग याबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन करण्यात आले.समारोप कार्यक्रमास माविमचे एडीसीओ सतीश भारती, आयसीआयसीआय बॅंकेच्या व्यवस्थापक आरती थोरात, माविमचे डीपीसी आशिष दगडे, दीपस्तंभ लोकसंचालित साधन केंद्र, भोरच्या व्यवस्थापक राजश्री कांबळे, श्वेता देवकर, सारिका जावळे, अध्यक्ष, राजमाता महिला महासंघ, वैशाली गव्हाणे, तसेच पल्लवी गुळवे, ललिता बऱ्हाटे व अन्य कर्मचारीवर्ग उपस्थित होते.प्रशिक्षक म्हणून रोशनी बेहरानी यांनी मार्गदर्शन केले, तर कार्यक्रमाचे संचालन व एकूण मार्गदर्शन इडीआयआयचे प्रकल्प अधिकारी सचिन मोरे यांनी केले. यावेळी बोलताना सचिन मोरे यांनी सांगितले की, प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांना पुढील १६ महिन्यांपर्यंत उत्पादन विकास, व्यवसाय वृद्धी, मार्केटिंग व ब्रँडिंग यासंदर्भात सातत्यपूर्ण मार्गदर्शन दिले जाणार आहे. महिलांनी उद्योजकतेसाठी पुढाकार घेतल्यास संस्थेमार्फत सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. सतीश भारती यांनी महिलांना प्रेरणादायी मार्गदर्शन करत आत्मनिर्भरतेसाठी प्रोत्साहित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहयोगिनी आरती घुले यांनी केले. महिला उद्योजिकांनी भारतीय उद्योजकता विकास संस्थेचे प्रोजेक्ट डायरेक्टर डॉ. रमण गुजराल यांचे आभार मानले.